गाझा युद्ध : हमासला मोठा झटका
वृत्तसंस्था/ दोहा
इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम आणि ओलिसांच्या मुक्ततेसाठी होत असलेल्या चर्चेत मध्यस्थाची भूमिका बजावत असलेल्या कतारने आता मोठा निर्णय घेतला आहे. युद्धविरामासाठी इस्रायल आणि हमास यांच्याकडून होत असलेली चालढकल पाहता नाराजी व्यक्त करत कतारने मध्यस्थाच्या भूमिकेतून काढता पाय घेतला आहे.
हमास आणि इस्रायलकडून चर्चेसाठी इच्छा दर्शविण्यात आली तरच आम्ही मध्यस्थ म्हणून काम करण्यास तयार होऊ असे कतारच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. गाझामध्ये मागील वर्षी ऑक्टोबरपासून इस्रायलने कारवाई चालविली असल्याने मोठी हानी झाली आहे. मागील काही काळापासून युद्धविरामासाठी कतारने प्रयत्न चालविले असले तरीही यात यश आलेले नाही.
तर कतारमध्ये हमासच्या प्रतिनिधींची उपस्थिती अस्वीकारार्ह असल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी पॅलेस्टिनी गट असलेल्या हमासवर गाझामधील युद्ध समाप्त करण्यासाठीचे नवे प्रस्ताव फेटाळण्याचा आरोप केला होता.
हमासचे नेते दोहा सोडणार
तडजोडीबद्दल सद्भावनापूर्ण चर्चा करण्यास नकार देण्यात आल्यावर मध्यस्थीचे प्रयत्न जारी ठेवू शकत नसल्याचे कतारने इस्रायल आणि हमासला कळविले आहे. कतारमध्ये राहत असलेल्या हमासच्या उर्वरित नेतृत्वाला वास्तव्य करू दिले जाणार की नाही याबद्दल निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु हमासच्या नेतृत्वाला कतारमधून गाशा गुंडाळावा लागणार असल्याचे मानले जात आहे. दोहामध्ये हमासच्या कार्यालयाचे संचालन उपयुक्त नाही, हमास प्रतिनिधिमंडळाला देशाबाहेर काढण्यात यावे असे अमेरिकेच्या प्रशासनाने दोन आठवड्यांपूर्वीच कतारला कळविले आहे. 2012 पासून कतारची राजधानी दोहामध्ये हमासचे कार्यालय संचालित होत आहे.









