दोहा
विश्वचषक स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या अ गटातील सामन्यात यजमान कतारचा सेनेगलकडून 1-3 असा पराभव झाल्यानंतर याच गटातील नेदरलँड्स (डच) व इक्वेडोर यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत राहिल्याने कतार या स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ बनला आहे.
बचावातील चुकीचा लाभ घेत सेनेगलने यजमान कतारवर 3-1 अशा गोलफरकाने विजय मिळविला. कतार हा 92 वर्षाच्या विश्वचषक इतिहासातील सर्वात वाईट प्रदर्शन करणारा यजमान संघ ठरला आहे. नेदरलँड्स व इक्वेडोर यांचे प्रत्येकी 4, सेनेगलचे 3 गुण झाले तर कतारला एकही गुण मिळविता आला नाही. कतारचा शेवटचा साखळी सामना नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे. त्या निकालाचा त्यांच्या स्थितीवर काहीही परिणाम होणार नाही.
नेदरलँड्सचा पहिला गोल सहाव्या मिनिटाला कॉडी गॅकपोने नोंदवला तर इक्वेडोरने 49 व्या मिनिटाला इनेर व्हॅलेन्सियाने बरोबरी साधून दिली.
सेनेगलने मात्र बाद फेरीच्या आशा पुन्हा ट्रकवर आणल्या असून त्यांना पहिल्या सामन्यात नेदरलँड्सकडून 0-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता. सेनेगलचा स्ट्रायकर बुलाये दियाने 41 व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवत आघाडी घेतली. कतारचा बौलेम खौखीने चेंडू क्लीअर करण्यात केलेल्या चुकीचा लाभ घेत दियाने आरामात हा गोल नोंदवला. फामारा डायधियूने उत्तरार्धाच्या सुरुवातीस (48 वे मिनिट) हेडरवर गोल नोंदवत ही आघाडी 2-0 अशी केली.
दियाच्या गोलआधी कतारची पेनल्टी हुकल्याने त्यांची एक संधी हुकली होती. रेफरीनी यावेळी कतारला पेनल्टी बहाल केली नव्हती. पण बदली खेळाडू मोहम्मद मुंतारीने 78 व्या मिनिटाला हेडरवर गोल नोंदवत विश्वचषकातील कतारचा पहिला गोल नोंदवण्याचा मान मिळविला. सेनेगलचा गोलरक्षक एदुआर्द मेन्डीने त्याआधी दोनदा अप्रतिम गोलरक्षण केले होते. बदली खेळाडू बाम्बा दिएंगने 82 व्या मिनिटाला तिसरा गोल नोंदवून कतारचे आव्हान संपुष्टात आणले. कतारचा हा दुसरा पराभव असून पहिल्या सामन्यात त्यांना इक्वेडोरने 2-0 असे हरविले होते.









