तीन राज्यात घरफोड्या : जामिनावर सुटल्यानंतरही तोच कित्ता, नाव प्रकाश मात्र अंधाराची ओढ
बेळगाव : भर पावसात बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्या वाढल्या आहेत. गुन्हेगारांनी पोलीस दलासमोर तपासाचे आव्हान उभे केले आहे. बेळगावात वेगवेगळ्या आंतरराज्य गुन्हेगारांच्या टोळ्या कार्यरत आहेत. गेल्या आठवड्यात सिंधुदुर्ग पोलिसांनी अटक केलेल्या प्रकाश विनायक पाटील (वय 38) या आंतरराज्य गुन्हेगाराने बेळगावातही घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे. 12 जुलै रोजी सिंधुदुर्ग पोलिसांनी प्रकाशला अटक केली आहे. त्याच्याजवळून एक गावठी कट्टा, चाकू, कटावणी, सुरा, तीन मोबाईल संच, कार, पाच तलवारी, कोयता, हातोडे, पक्कड, छिन्नी, ड्रिल मशीन, वेगवेगळ्या देशांची 160 परदेशी नाणी, 27 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. बेळगाव परिसरातही त्याने घरफोड्या केल्याचे उघडकीस आल्यानंतर बेळगाव पोलिसांनी सिंधुदुर्ग पोलिसांशी संपर्क साधला आहे. प्रकाशला लवकरच चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येणार आहे.
प्रकाश विनायक पाटील हा गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या तीन राज्यात अट्टल गुन्हेगार म्हणून ओळखला जातो. एरव्ही चोऱ्या, घरफोड्यांमध्ये लुटलेले दागिने गुन्हेगार सराफांना आहेत तशाच स्वरुपात विकतात. प्रकाशची कार्यपद्धती वेगळी आहे. तो हे दागिने वितळवून त्यांची विक्री करतो. पोलिसांनी सोने व चांदी वितळवणारी इलेक्ट्रॉनिक भट्टी, वेगवेगळे साचे जप्त केले आहेत. वेगवेगळ्या चोरी प्रकरणातील मुद्देमालही सिंधुदुर्ग पोलिसांनी जप्त केला आहे. प्रकाश हा झरीवाडा, साखळी-गोवा येथील राहणारा असला तरी तो मूळचा बेळगावचा. सरस्वती रोड, शहापूर येथील तो राहणारा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्याने गोव्यात स्थलांतर केले आहे. एखाद्या जिल्ह्यात किंवा राज्यात पोलिसांनी अटक केली तर तपास अधिकाऱ्यांसमोर आपण नेमक्या किती ठिकाणी चोरी केली, लुटीतील दागिन्यांची विक्री कोठे केली? याची पोपटासारखी माहिती देतो. बेळगावात यापूर्वी त्याला अनेक वेळा अटक झाली आहे. पोलिसांकडून मारबडव होऊ नये, यासाठी तो कबुली देऊन मोकळा होतो. पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पचे याआधीचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रकाश व त्याचा साथीदार महेश केळगिनकोप्प (वय 37) मूळचा रा. खानापूर, सध्या रा. वैभववाडी सिंधुदुर्ग या दोघा जणांना नोव्हेंबर 2022 मध्ये अटक केली होती. त्यांच्याजवळून तब्बल दीड किलो सोने, चार किलो चांदी असा ऐवज जप्त करण्यात आला होता. बेळगाव शहरात 13 व धारवाडमध्ये 9 घरफोड्या केल्याची कबुली त्यांनी दिली होती.
त्याआधीही डिसेंबर 2020 मध्ये बेळगाव ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात तो अडकला होता. योगेश तळेवाड व चन्नाप्पा हुंचाळ या दोन पोलिसांनी झाडशहापूरजवळ शेतवाडीत पाठलाग करून प्रकाशला अटक केली होती. त्यावेळीही मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून बेळगावात चोऱ्या, घरफोड्या करणारा प्रकाश नेहमी आपले साथीदार बदलत असतो. अनेक वेळा बेळगाव पोलिसांनी त्याची धरपकड करूनही तो पुन्हा गुन्ह्यांसाठी गोव्याहून बेळगावात येतो. चोरी करून लुटीच्या पैशातून मौजमजा करणे, आलीशान वाहने वापरणे हा प्रकाश व त्याच्या साथीदारांचा उद्योग आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या तीन राज्यात त्याच्यावर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल आहेत. आता बेळगाव येथील उद्यमबाग, टिळकवाडी, एपीएमसी, माळमारुती पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात पाच घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणांच्या चौकशीसाठी त्याला न्यायालयाची परवानगी घेऊन पोलीस कोठडीत घेण्यात येणार आहे. एपीएमसी व उद्यमबाग पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या चोऱ्या-घरफोड्या प्रकरणात तर त्याची छबी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यामुळे बेळगाव पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधण्यास सुरुवात केली होती. तो मूळचा बेळगावचा, गोव्यात वास्तव्य असले तरी कोकणात एखादे घर भाड्याने घेऊन तीन राज्यात गुन्हे केल्यानंतर त्या घरात तो आश्रय घेतो. आजवरचा त्याचा हाच शिरस्ता आहे. तो नेहमी आपले साथीदार बदलत असतो. काही वेळा त्याचे साथीदार स्थानिक असतात तर काही वेळा परप्रांतीय असतात. त्याला अटक झाली तरी बाहेर त्याचे साथीदार चोऱ्या करतच असतात. मध्यंतरी दोडामार्ग परिसरात त्याने ठाण मांडले होते. तेथून तो बेळगावात यायचा. पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यानंतर त्याने तेथूनही आपले बस्तान हलवले होते. भरदिवसा घरफोड्या करणाऱ्या प्रकाश पाटीलच्या गुन्हेगारी कारवायांविषयी तरुण भारतने अनेक वेळा नागरिकांना सावध केले आहे. चोरी करताना आपली छबी सीसीटीव्हीत कैद होऊ नये, यासाठी तो पुरेपूर काळजी घेतो. तरीही बेळगाव शहरातील अनेक ठिकाणी त्याचा चेहरा स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
शस्त्रांचा साठा, नंबरप्लेटचा गठ्ठा!
यापूर्वी ज्या ज्यावेळी त्याला अटक झाली, त्या त्यावेळी त्याच्याजवळ जांबिया, तलवारी, पिस्तुल आदी घातक शस्त्रs जप्त करण्यात आली आहेत. तो नेहमी चोऱ्या, घरफोड्या करताना आपल्याजवळ शस्त्रs बाळगतो. मात्र, आजवर एकदाही त्याने शस्त्रांचा वापर केल्याची उदाहरणे नाहीत. 6 डिसेंबर 2020 रोजी झाडशहापूरजवळ शेतवडीत पाठलाग करून त्याला पकडण्यात आले. त्यावेळी तो नागरिकांना व पोलिसांना चाकूचा धाक दाखवत होता. मात्र, आजवर शस्त्रांचा त्याने वापर केल्याची उदाहरणे नाहीत. गोवा किंवा कोकणातून बेळगावला येताना त्याच्या कारला एक वेगळाच क्रमांक असतो. परत जाताना क्रमांक बदललेला असतो. कार नंबरप्लेटचा गठ्ठाच त्याच्याजवळ असतो. अशी पार्श्वभूमीवर असलेल्या प्रकाश पाटीलला लवकरच चौकशीसाठी बेळगाव पोलीस ताब्यात घेणार आहेत.









