कोरियन ओपन बॅडमिंटन : एचएस प्रणॉय, प्रियांशु राजावत दुसऱ्या फेरीत : किदाम्बी श्रीकांतलाही पराभवाचा धक्का
वृत्तसंस्था/ सेऊल (दक्षिण कोरिया)
येथे सुरु असलेल्या कोरियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला सलामीच्या सामन्यातच पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतही पराभूत झाला आहे. अन्य लढतीत एचएस प्रणॉय, युवा बॅडमिंटनपटू प्रियांशू राजावत यांनी शानदार विजयासह दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.
बुधवारपासून सुरु झालेल्या प्रतिष्ठित अशा कोरियन ओपन स्पर्धेत जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेल्या प्रणॉयने बेल्जियमच्या ज्युलियन कॅरेगीचा 21-13, 21-17 असा पराभव केला. 33 मिनिटे चाललेल्या या सामन्यात प्रणॉयने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारले. आता, त्याची पुढील फेरीत लढत हाँगकाँगच्या 18 व्या मानांकित ली च्युक यू शी होईल. याशिवाय, अन्य एका सामन्यात प्रियांशू राजावतने विजयी प्रारंभ करताना कोरियाच्या चोई जी हूनचा 21-15, 21-19 असा पराभव केला. ही लढत 42 मिनिटे चालली. आता, त्याचा सामना अव्वलमानांकित जपानच्या कोडाई नाराओकाशी होईल.
एकीकडे प्रणॉय व राजावतने विजयी सलामी दिल्यानंतर स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतचे आव्हान मात्र पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. माजी चॅम्पियन व जपानचा अव्वल बॅडमिंटनपटू केंटा मोमोटाने त्याला 21-12, 22-24, 21-17 असे पराभूत केले. श्रीकांतने पहिला गेम जिंकत शानदार सुरुवात केली होती पण दुसऱ्या व तिसऱ्या गेममध्ये मात्र त्याला सातत्य राखता आले नाही व पराभवाचा सामना करावा लागला.
सिंधूचे सलामीच्या लढतीत पॅकअप
महिला एकेरीच्या सलामीच्या सामन्यात पीव्ही सिंधूला चिनी तैपैईच्या 22 व्या मानांकित पे युई पो कडून 18-21, 21-10, 13-21 असा पराभव स्वीकारावा लागला. 51 मिनिटे चाललेल्या या सामन्यात सिंधूकडून अनेक चुका झाल्या, याचा तिला फटका बसला. याउलट नवख्या तैपेईच्या पे युईने शानदार खेळ साकारताना सिंधूला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. मागील दोन महिन्यात सिंधूला एकाही स्पर्धेचे जेतेपद पटकावता आलेले नाही. सतत खेळत असल्यामुळे या स्पर्धेत ती काहीशी थकल्यासारखी दिसत होती. याशिवाय, सलग पराभवामुळे जागतिक क्रमवारीत तिची 17 व्या स्थानी घसरण झाली आहे.









