मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन : किदाम्बी श्रीकांत स्पर्धेबाहेर
वृत्तसंस्था /क्वालालम्पूर
येथे सुरु असलेल्या मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे स्टार खेळाडू पीव्ही सिंधू व एचएस प्रणॉय यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पुरुषांच्या एकेरी गटात मात्र दिग्गज खेळाडू किदाम्बी श्रीकांतला मात्र पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे त्याचे आव्हान संपुष्टात आले आहे. शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात सिंधूने जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असणाऱ्या चीनच्या यी मान झांगचा 21-16, 13-21, 22-20 असा पराभव केला. 74 मिनिटे चाललेल्या या सामन्यात सिंधूला विजयासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. सिंधूने पहिला गेम सहज जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये मात्र प्रतिस्पर्धी झांगने पुनरागमन करत हा गेम जिंकला. यानंतर तिसऱ्या व निर्णायक गेममध्ये मात्र सिंधू व झांग यांच्यात एकेका गुणासाठी चांगलाच संघर्ष पहायला मिळाला. अखेरच्या क्षणी सिंधूने 20-20 अशा बरोबरीत असताना दोन गुणाची कमाई करत निर्णायक गेम जिंकत सामन्यात बाजी मारली. आता, उपांत्य फेरीत तिचा सामना इंडोनेशियाच्या ग्रिगोरिया मारिस्काशी होईल.
प्रणॉय उपांत्य फेरीत, श्रीकांत स्पर्धेबाहेर
पुरुष गटात एचएस प्रणॉयने आपला धडाका कायम ठेवताना जपानच्या केंटा निशिमोटोचा 25-23, 18-21, 21-13 असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असणाऱ्या प्रणॉयला पहिला गेम जिंकण्यासाठी चांगलेच परिश्रम घ्यावे लागले. दुसरा गेम मात्र निशिमोटोने जिंकत सामन्यात बरोबरी साधली. यानंतर निर्णायक गेममध्ये प्रणॉयने बाजी मारत उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता, त्याचा पुढील लढत इंडोनेशियाच्या एडिनाटाशी होईल. दरम्यान अन्य एका लढतीत किदाम्बी श्रीकांतला एडिनाटाकडून 16-21, 21-16, 21-11 अशी हार पत्कारावी लागली. इंडोनेशियाच्या या युवा खेळाडूने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारताना श्रीकांत जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही.









