कॅनडा ओपन बॅडमिंटन : सिंधूचा बहारदार खेळ
वृत्तसंस्था/ टोरांटो
येथे सुरु असलेल्या कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार खेळाडू पीव्ही सिंधू व लक्ष्य सेन यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूने चीनच्या फँग जीचा तर लक्ष्य सेनने जर्मनीच्या ज्युलियनचा पराभव केला.
शुक्रवारी झालेल्या महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळणाऱ्या सिंधूने चीनच्या फँगला 21-13, 21-7 असे एकतर्फी पराभूत केले. दमदार फॉर्ममध्ये असलेल्या सिंधूने चीनच्या फँग जीविरुद्ध सुरेख खेळाचे प्रदर्शन साकारले. आता, उपांत्य फेरीत तिची लढत जपानची दिग्गज खेळाडू व जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या अकाने यामागुचीविरुद्ध होईल. सिंधूने पहिल्या गेममध्ये 5-1 अशी आघाडी घेतली होती. यानंतर तिने आपली आघाडी वाढवत 16-12 पर्यंत नेली. फँगने काही गुण मिळवण्याचा प्रयत्न केला पण सिंधूच्या आक्रमतेसमोर तिचा निभाव लागला नाही. यानंतर सिंधूने पहिला गेम 21-13 असा सहज जिंकला. यानंतर दुसऱ्या गेममध्ये सिंधूने फँगला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. तिने हा गेम 21-7 असा जिंकत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.
लक्ष्य सेनही उपांत्य फेरीत
दरम्यान, शनिवारी पुरुष गटातील उपांत्यपूर्व सामन्यात लक्ष्य सेनने उपांत्य फेरी गाठली आहे. त्याने जर्मनीच्या ज्युलियन केरागीचा 21-8, 17-21, 21-10 असा पराभव केला. आता, लक्ष्यचा उपांत्य फेरीत मुकाबला जपानच्या चौथ्या मानांकित केंटा निशिमोटोविरुद्ध होईल. दरम्यान, जर्मनीच्या ज्युलियनविरुद्ध लढतीत लक्ष्यला विजयासाठी तिसऱ्या गेमपर्यंत वाट पहावी लागली. लक्ष्यने पहिला गेम 21-8 असा जिंकत धडाक्यात सुरुवात केली. पण, दुसऱ्या गेममध्ये ज्युलियनने पुनरागमन करताना हा गेम 21-17 असा जिंकत 1-1 अशी बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक गेममध्ये मात्र लक्ष्यने जोरदार पुनरागमन करताना ज्युलियनला चांगलेच बॅकफूटवर ढकलले. त्याने हा गेम 21-10 असा सहजरित्या जिंकत सेमीफायनल गाठली.









