इंडिया ओपन बॅडमिंटन : पुरुष दुहेरीत सात्विक-चिरागचा विजयी धडाका कायम
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारताची दोन वेळ ऑलिम्पिक चॅम्पियन पीव्ही सिंधूसह किरण जॉर्जने आपली विजयी घोडदौड कायम ठेवताना इंडिया ओपन बॅडमिंटनची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तसेच पुरुष दुहेरीत भारताच्या दिग्गज सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांनी देखील विजयासह अंतिम 8 मध्ये स्थान निश्चित केले आहे. गुरुवारी झालेल्या महिला एकेरीच्या सामन्यात सिंधूने जपानच्या 46 व्या मानांकित मनामी सुइजूचा 21-15, 21-13 असा धुव्वा उडवला. 45 मिनिटे चाललेल्या या लढतीत सिंधूने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन साकारताना प्रतिस्पर्धी मनामीला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळणाऱ्या सिंधूने पहिल्या गेममध्ये 11-2 अशी आघाडी घेतली. यानंतर तिने आपल्या खेळात सातत्य राखत हा गेम 21-15 असा जिंकला व 1-0 अशी आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या गेममध्येही सिंधूने आपला दबदबा कायम ठेवला. जपानच्या मनामीने काही गुण मिळवत तिला टक्कर देण्याचा प्रयत्न केला पण तिला फारसे यश आले नाही. आक्रमक खेळणाऱ्या सिंधूने हा गेम 21-13 असा जिंकत उपांत्यपूर्व फेरीतील स्थान देखील निश्चित केले. आता, उपांत्यपूर्व फेरीत तिची लढत इंडोनेशियाच्या जीएम टुजुंगशी होईल.
किरण जॉर्जची विजयी आगेकूच
पुरुष एकेरीत भारताचा युवा खेळाडू किरण जॉर्जने फ्रान्सच्या अॅलेक्स लेनरचा 22-20, 21-13 असा पराभव केला. चुरशीच्या झालेल्या या लढतीत फ्रान्सच्या अॅलेक्सने किरणला चांगलीच टक्कर दिली. पहिल्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंत एकेका गुणासाठी संघर्ष पहायला मिळाला. एकवेळ 18-18, 20-20 अशी बरोबरी होती पण किरणने नेटजवळ दोन गुणाची कमाई करत हा गेम 22-20 असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मात्र किरणने सरस खेळ केला. आक्रमक खेळ करत त्याने हा गेम 21-13 असा जिंकत उपांत्यपूर्व फेरी गाठली. आता, पुढील फेरीत त्याचा सामना चीनच्या हांग यांग वेंगशी होईल.
पुरुष दुहेरीत सात्विक-चिराग पुढील फेरीत
इंडिया ओपनमध्ये पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक-चिराग शेट्टी जोडीने विजयासह उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात भारतीय जोडीने जपानच्या हिरोकी ओकुमुरा व केन्या मितुहाशी जोडीचा 20-22, 21-14, 21-16 असा पराभव केला. 79 मिनिटे चाललेल्या या सामन्यात जपानच्या जोडीने भारतीय जोडीला विजयासाठी चांगलेच झुंजवले. पहिला गेम गमावल्यानंतर भारतीय जोडीने जबरदस्त कमबॅक करताना दुसरा व तिसरा गेम सहज जिंकत विजयाला गवसणी घातली.









