मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा : दोन वर्षानंतर जेतेपद मिळवण्याची संधी
वृत्तसंस्था/ क्वालालम्पूर
दोन वेळ ऑलिम्पिक चॅम्पियन पीव्ही सिंधूने मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. शनिवारी झालेल्या उपांत्य सामन्यात तिने थायलंडच्या बुसानन ओगंबामरुंगफानचा पराभव केला. विशेष म्हणजे, 2022 नंतर सिंधूला एकही आंतरराष्ट्रीय जेतेपद मिळवता आलेले नाही, आता दोन वर्षानंतर प्रथमच तिला जेतेपद मिळवण्याची संधी असणार आहे. आज अंतिम फेरीत तिचा सामना चीनच्या सातव्या मानांकित वांग झी यी शी होईल. याशिवाय, पुरुष गटात डेन्मार्कचा व्हिक्टर अॅक्सलसेन व मलेशियाचा झी जिय ली यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
सिंधूने शुक्रवारी खेळल्या गेलेल्या उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या हान यूचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली होती. शनिवारी तिचा उपांत्य फेरीत सामना थायलंडच्या बुसाननशी झाला. तब्बल 88 मिनिटे चाललेल्या या संघर्षमय सामन्यात सिंधूने जागतिक क्रमवारीत 20 व्या स्थानी असलेल्या बुसाननचा 13-21, 21-16, 21-12 असा पराभव केला. सुरुवातीपासून आक्रमक खेळणाऱ्या बुसाननने पहिला गेम 21-13 असा सहज जिंकत 1-0 अशी आघाडी घेतली. या गेममध्ये सिंधूकडून काही चुका झाल्या, याचा फायदा तिने घेतला. यानंतर मात्र सिंधूने दुसऱ्या गेममध्ये शानदार पुनरागमन केले, हा गेम तिने 21-16 असा जिंकत सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. यानंतर तिसऱ्या व निर्णायक गेममध्ये सिंधूने बाजी मारली. नेटजवळ तिने शानदार खेळ साकारताना बुसाननला चुका करण्यास भाग पाडले, याचा फायदा घेत सिंधूने हा गेम 21-12 असा सहज जिंकला व अंतिम फेरीतील आपले स्थान देखील निश्चित केले. विशेष म्हणजे, सिंधूचा बुसाननविरुद्ध 19 सामन्यापैकी 18 वा विजय आहे. बुसाननने सिंधूला केवळ एकदाच 2019 मध्ये हाँगकाँग ओपनमध्ये पराभूत केले होते.
दोन वर्षानंतर जेतेपदाची संधी
जागतिक क्रमवारीत 15 व्या स्थानी असलेल्या सिंधूचा अंतिम सामना चीनच्या सातव्या मानांकित वांग झी यी शी होईल. सिंधू व वांग यांच्यात आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यापैकी दोन सामने सिंधूने जिंकले आहेत. 2022 मध्ये सिंधूने सिंगापूर ओपनचे जेतेपद पटकावले होते यानंतर तिला दोन वर्षात एकही जेतेपद मिळवता आलेले नाही. यामुळे आज होणाऱ्या अंतिम लढतीत वांग झी विरुद्ध शानदार खेळ साकारत जेतेपद मिळवण्याची नामी संधी आहे. विशेष म्हणजे, पॅरिस ऑलिम्पिकला दोन महिन्यापेक्षा कमी कालावधी राहिला आहे. सिंधूने आतापर्यंत दोन वेळा ऑलिम्पिक पदक पटकावले आहे. ऑलिम्पिक स्पर्धा जवळ आलेली असताना सिंधूला सापडलेला सूर महत्वाचा मानला जात आहे.