वृत्तसंस्था/ जकार्ता
इंडोनेशिया ओपन वर्ल्ड टूर सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधू व एचएस प्रणॉय यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला तर त्रीशा जॉली व गायत्री गोपीचंद यांचे महिला दुहेरीतील आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.
पीव्ही सिंधूने महिला एकेरीच्या पहिल्या लढतीत स्थानिक खेळाडू ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंगचा 21-19, 21-15 असा सरळ गेम्सनी पराभव केला. सिंधूला अलीकडे झालेल्या दोन स्पर्धांत पहिल्या फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले होते. तुनजुंगकडून तिला माद्रिद मास्टर्स व मलेशिया मास्टर्स स्पर्धेत पराभव पत्करावा लागला होता. पण यावेळी तिने तुनजुंगला पराभूत करीत गेल्या तीन लढतीत तिच्यावर पहिला विजय मिळविला.
जागतिक क्रमवारीत 13 व्या स्थानापर्यंत घसरण झालेल्या सिंधूला पहिल्या गेममध्ये कडवी लढत द्यावी लागली. तुनजुंगने एका ड्रॉप शॉटवर गुण मिळवित सिंधूवर 9-7 अशी आघाडीही घेतली होती. पण आपल्या उंंचीचा लाभ घेत सिंधूने ब्रेकपर्यंत 11-10 अशी आघाडी मिळविली. नंतर तुनजुंगने पेलेल्या सलग तीन चुकांमुळे सिंधूने तीन गुण घेत गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने अडखळत सुरुवात केली. पण नंतर जबरदस्त खेळ करीत तुनजुंगला अनेक चुका करण्यास भाग पाडले आणि गेमसह सामना जिंकत आगेकूच केली. सिंधू व तुनजुंग यांच्यात आतापर्यंत 10 लढती झाल्या असून सिंधूने 8 व तुनजुंगने 2 लढती जिंकल्या आहेत. सिंधूची पुढील लढत तिसऱ्या मानांकित तैवानच्या ताय त्झू यिंग या आणखी एका तगड्या खेळाडूशी होणार आहे. यिंगने सिंधूविरुद्ध मागील आठ सामन्यांत विजय मिळविला असून सिंधूला तिची ही घोडदौड रोखण्याचे कडवे आव्हान पेलावे लागणार आहे. आतापर्यंत दोघींत 23 लढती झाल्या असून यिंगने 18 तर सिंधूने 5 लढती जिंकल्या आहेत.
फॉर्ममध्ये असलेल्या एचएस प्रणॉयने येथेही विजयी प्रारंभ करताना जपानच्या केन्टा निशिमोटोचा 21-16, 21-14 असा केवळ 50 मिनिटांत पराभव केला. गेल्या आठवड्यात सातव्या मानांकित प्रणॉयने मलेशिया मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद मिळविले असून त्याची पुढील लढत हाँगकाँगच्या एन्ग का लाँगशी होणार आहे.
महिला दुहेरीत त्रीशा जॉली व गायत्री गोपीचंद यांना पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला. जपानच्या रिन इवानगा व काए नाकानिशी यांच्याकडून त्यांना चुरशीच्या लढतीत 22-20, 12-21, 16-21 असा पराभव स्वीकारावा लागला. पहिला गेम जिंकून भारतीय जोडीने आघाडी घेतली होती. पण नंतर त्यांना ती टिकविता आली नाही. सुमारे सव्वातास ही लढत रंगली होती. पुरुष दुहेरीत जागतिक पाचव्या मानांकित सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांची सलामीची लढत इंडोनेशियाच्या मार्कस फरनाल्डी गिडॉन व केविन संजया सुकामुल्जो यांच्याशी होणार आहे.









