वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या पीव्ही सिंधूचे येथे सुरू असलेल्या इंडिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य मिळविणाऱ्या इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंगने तिचा पराभव केला.
सिंधू ही या स्पर्धेची माजी विजेती असून पहिला गेम एकतर्फी गमविल्यानंतर जोरदार झुंज दिली. पण तिला अखेर 9-21, 21-19, 17-21 असा पराभव स्वीकारावा लागला. 62 मिनिटे ही लढत रंगली होती. निर्णायक गेममध्ये सिंधूने झुंजार खेळ केला. तुनजुंगने तीन मॅचपॉईंट्स मिळविल्यानंतर सिंधूने कठोर संघर्ष केला. पण एका क्रॉसकोर्ट फटक्यावर गेमसह सामना जिंकून आगेकूच केली.









