वृत्तसंस्था/ व्हान्ता, फिनलँड
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने येथे सुरू झालेल्या आर्क्टिक ओपन 2023 बॅडमिंटन स्पर्धेत जपानच्या नोझोमी ओकुहाराचा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
दोन वेळची ऑलिम्पिकपदकविजेत्या असणाऱ्या सिंधूने ओकुहारावर 21-13, 21-6 अशी सहज मात केली. या दोघींची ही एकंदर 19 वी लढत होती. त्यापैकी सिंधूने 10 वेळा ओकुहारावर मात केली आहे. यापूर्वीच्या दोन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत त्यांची गाठ पडली होती आणि त्यात दोघींनी एकेकदा विजय मिळविला. येथील सामन्यात सिंधू प्रारंभी 0-4 अशी पिछाडीवर पडली होती. मात्र नंतर 13 व्या क्रमांकावर असणाऱ्या सिंधूने उंचीचा लाभ उठवत मुसंडी मारली आणि पहिल्या ब्रेकपर्यंत 11-6 अशी आघाडी घेतली. सिंधूने आक्रमक खेळ ब्रेकनंतरही पुढे चालू ठेवला आणि हा गेमही जिंकला. दुसऱ्या गेममध्येही सिंधूने ओकुहारावर वर्चस्व राखले आणि ब्रेकपर्यंत 11-3 अशी आघाडी घेतली. ब्रेकनंतरही वर्चस्व कायम राखत हा गेम आरामात घेत सामनाही जिंकला.
अन्य लढतीत आकर्षी कश्यपने एका गेमची पिछाडी भरून काढत बेल्जियमच्या लियानी टॅनवर 18-21, 22-20, 21-18 अशी मात केली. 41 व्या मानांकित आकर्षीची पुढील लढत चीनच्या जागतिक अकराव्या मानांकित वांग झियी हिच्याशी होईल.
दरम्यान, हर्षित अगरवालला मात्र येथील मुख्य स्पर्धेत स्थान मिळविता आले नाही. पात्रता फेरीत त्याला फिनलँडच्या जोआकिम ओल्डॉर्फकडून 21-19, 21-12 असे पराभूत झाला. मिश्र दुहेरीत के साई प्रतीक व तनिशा क्रॅस्टो यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. या जोडीने डेन्मार्कच्या आंद्रेयास सोन्डनगार्ड-इबेन बर्गस्टीन यांच्यावर चुरशीच्या लढतीत 26-24, 21-18 अशी मात केली. तनिशा महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पासमवेत खेळत आहे.









