अध्यक्ष ट्रंप सहकारी ग्रॅहॅम यांच्याकडून प्रतिपादन
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
भारताला अमेरिकेच्या 50 टक्के करापासून वाचविण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अलास्का येथे चर्चेच्या प्रस्तावाचा स्वीकार केला, असे खळबळजनक प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचे सहकारी लिंडसे ग्रॅहॅम यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत.
अध्यक्ष पुतीन हे अलास्का येथे त्या प्रांताची पाहणी करण्यासाठी आले नव्हते. 19 व्या शतकात अलास्का प्रांत अमेरिकेने रशियाकडून विकत घेतला होता. त्यानंतर या प्रांताची स्थिती अशी आहे, हे पाहण्यासाठी ते येथे आले नव्हते. तर अमेरिकेने भारतावर रशियाचे तेल खरेदी केल्यामुळे लागू केलेल्या 50 टक्के करापासून भारताला सोडवावे, यासाठी त्यांचा हा दौरा होता. अमेरिकेने रशियाच्या मित्र देशांना दोन पर्याय दिले आहेत. त्यांनी एक तर रशियाचे स्वस्त तेल स्वीकारावे किंवा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा लाभ घ्यावा. अमेरिकेला शाश्वती आहे, की रशियाचे मित्रदेश अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेशी जोडून घेण्याचा पर्याय स्वीकारतील, असेही प्रतिपादन लिंडसे ग्रॅहॅम यांनी रविवारी केले आहे.
रशियावर दबाव टाका…
रशिया-युव्रेन युद्ध थांबले नाही, तर रशियाचे मित्रदेश, जे रशियाकडून स्वस्त तेल आणि वायू विकत घेतात, त्यांच्यावर मोठे कर लावले जावेत, जेणेकरुन ते ही खरेदी थांबवितील आणि रशियाची अर्थव्यवस्था उध्वस्त होईल, असा माझा अध्यक्ष ट्रंप यांना सल्ला आहे, असे वक्तव्यही ग्रॅहॅम यांनी केले आहे.
रशिया दहशतवादी देश…
रशिया हा दहशतवादाचा पाठीराखा देश आहे, अशी घोषणा अमेरिकेने करावी, असे विधेयक मी अमेरिकेच्या सिनेटमध्ये सादर करणार आहे. या विधेयकाला रिपब्लिकन आणि डेमॉव्रेटिक अशा दोन्ही पक्षांचा पाठिंबा मिळेल, असे विधानही ग्रॅहॅम यांनी केले आहे. त्यांच्या विधानांवर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्यांची विधाने गांभीर्याने घेण्यासारखी नाहीत, असेही बोलले जात आहे. मात्र, त्यांच्या विधानांमुळे भविष्यात जागतिक राजकारण कशी वळणे घेणार, या संबंधी बऱ्याच शंका निर्माण होणार असून भारताने सावध राहण्याची आवश्यकता आहे. तसेच आपल्या व्यवस्थेवर भर देण्याची आवश्यकता आहे, हे दिसून येते.









