वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतात 8 ते 10 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन प्रत्यक्ष येणार नाहीत, असे रशियाच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सध्या ते युक्रेनविरोधात विशेष युद्ध अभियानाममध्ये गुंतले असल्याने ते येऊ शकणार नाहीत, अशी माहिती पुतिन यांचे शासकीय निवासस्थान व्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कॉव्ह यांनी दिली.
पुतिन यांनी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे आयोजित ब्रिक्स परिषदेही प्रत्यक्ष सहभाग घेतला नव्हता. त्यांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांना पाठविले होते. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने पुतिन यांच्या विरोधात युव्रेन युद्धात युद्धगुन्हे केल्याचा आरोप ठेवला असून अटक वॉरंटही जारी केले आहे. दक्षिण आफ्रिका हा देश आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचा स्वाक्षरीदार देश आहे. त्यामुळे कदाचित त्या देशात आपल्याला अटक होईल, अशा समजुतीने पुतिन यांनी दौरा टाळला असा आरोप केला गेला होता. तथापि, रशियाने पुतिन यांच्या अनुपस्थितीसाठी हे कारण नसल्याचे स्पष्ट केले.
भारत हा या न्यायालयाचा स्वाक्षरीदार देश नाही. तरीही पुतिन यांनी भारताचा दौऱ्या टाळला आहे. आधी ते येतील असे स्पष्ट करण्यात आले होते. पण त्यांनी रशियात आपली आवश्यकता असल्याने येत नसल्याचे प्रतिपादन केले आहे. रशिया हा जी-20 परिषदेच्या संस्थापक देशांपैकी एक आहे.









