युक्रेन युद्धविरामासंबंधी रशियन अध्यक्षांचे वक्तव्य
वृत्तसंस्था / मॉस्को
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यात शांतता प्रस्थपित व्हावी, म्हणून व्यापक प्रयत्न केले आहेत, अशी भलावण रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केली आहे. या दोन्ही नेत्यांचे त्यांनी शुक्रवारी आभारही मानले आहेत. हे दोन्ही नेते, तसेच इतर जागतिक नेते यांनी रशिया-युक्रेन विवादावर योग्य तो तोडगा निघावा, यासाठी जे अभियान हाती घेतले, ते प्रशंसनीय आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. शुक्रवारी ट्रंप आणि पुतीन यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा झाली. या चर्चेनंतर ट्रंप यांनी रशिया-युव्रेन युद्ध थांबेल असा आशावाद व्यक्त केल्याचे वृत्त आहे.
शुक्रवारी पुतीन यांनी बेलारुसचे अध्यक्ष अलेक्झांडर ल्युकाशेंको यांच्या समवेत एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत त्यांना रशिया-युक्रेन वादासंबंधी प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रामुख्याने उल्लेख केला. इतर अनेक देशांच्या नेत्यांचेही त्यांनी आभार मानले. युक्रेनने रशियाची 1 महिन्याची शस्त्रसंधी करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे, याची रशियाला माहिती आहे. रशिया यासंबंधात आपला दृष्टीकोन स्पष्ट करेलच. आम्हाला हा तोडगा तत्वत: योग्य वाटतो. तथापि, आमच्या काही महत्वाच्या शंका आहेत. त्यांचे निराकरण झाल्याशिवाय आम्ही पुढचे पाऊल टाकू शकत नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
रशियाच्या अनेक अटी
रशिया आणि युक्रेन यांच्यातील वादावर अंतिम तोडगा काढण्याच्या अभियानाचा एक भाग म्हणून प्रथम दोन्ही देशांमध्ये एक महिन्याच्या कालावधीसाठी शस्त्रसंधी करार केला जावा, असा प्रस्ताव अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ठेवला आहे. रशियाने या प्रस्तावावर सकारात्मक भूमिका घेतली असली, तरी अनेक अटी ठेवल्या आहेत. यासंदर्भात अमेरिकेच्या राजदूताशी पुतीन यांची चर्चाही झाली आहे. तथापि, रशियाच्या भूमिकेत अद्याप स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे या प्रस्तावाचे काय होणार, हे काही दिवसांनंतर कळणार आहे.
झेलेन्स्की यांची टीका
एक महिन्याच्या शस्त्रसंधी प्रस्तावाला युव्रेनने विनाअट मान्यता दिली असली, तरी रशियाने अटी घातल्या आहेत. याचा अर्थ रशियाला हा प्रस्ताव स्वीकारावा असे मनातून वाटत नाही. मात्र, तसे स्पष्टपणे अमेरिकेला सांगण्याचे धाडस पुतीन यांच्यापाशी नाही, अशी टीका युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी शुक्रवारी केली. अटी घातल्यास प्रस्तावाचे गांभीर्य संपेल, असे यांचे म्हणणे आहे.
कॅनडाला सवलत नाही !
कॅनडा देशाला अमेरिका कोणतीही सवलत देणार नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकवार स्पष्ट केले आहे. ते व्हाईट हाऊसमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलत होते. अमेरिकेने कॅनडाहून आयात होणाऱ्या पोलाद आणि तांब्यावरील कर मोठ्या प्रमाणात वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये वाद निर्माण झाला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष थांबेल, असा विश्वास आपल्याला वाटतो, असे प्रतिपादनही ट्रम्प यांनी शुक्रवारी केले.
रशियाच्या अटी कोणत्या…
अमेरिकेचा एक महिन्याचा शस्त्रसंधी प्रस्ताव मान्य करण्यासाठी रशियाने अनेक अटी घातल्या आहेत. या अटी कोणत्या हे अद्याप नेमकेपणाने स्पष्ट झालेले नाही. तथापि, युव्रेनला कोणीही शस्त्रपुरवठा करु नये, तसेच युक्रेनचा जो भाग रशियाने ताब्यात घेतला आहे, त्यासंदर्भात या एका महिन्यात कोणतीही तडजोड होणार नाही, असे रशियाचे म्हणणे असल्याचे समजते. दोन्ही देशांमध्ये निरंतर शांतता प्रस्थापित होण्यासाठी अद्याप किती काळ लागणार हे अस्पष्टच आहे.









