वृत्तसंस्था / मॉस्को
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारकाळात झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर त्यांच्यावरील संकट दूर व्हावे, यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी प्रार्थना केली होती, असे आता समोर आले आहे. एका वृत्तसंस्थेच्या पॉडकास्टमध्ये अमेरिकेचे एक मुत्सद्दी स्ट्यू विटकॉफ यांनी ही माहिती दिली आहे. पुतीन यांच्या या कृतीमुळे त्यांचे ट्रंप यांच्याशी किती मैत्रीचे आणि जवळीकीचे संबंध आहेत, याची प्रचीती येते असे प्रतिपादन विटकॉफ यांनी केले. त्यांच्या हे विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे.
ज्यावेळी पुतीन यांना ट्रंप यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती देण्यात आली, तेव्हा ते त्यांच्या स्वत:च्या चर्चमध्ये गेले आणि त्यांनी चर्चच्या पुरोहितांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पुरोहितांच्या मार्गदर्शनात ट्रंप यांच्या आयुरारोग्यासाठी प्रार्थना केली. ट्रंप यांच्यासंबंधी पुतीन यांना अत्याधिक आपुलकी आहे. त्यामुळे त्यांना अशी प्रार्थना करावीशी वाटली, अशी माहिती विटकॉफ यांनी या पॉडकास्टमध्ये दिली.
केव्हा झाला हल्ला
डोनाल्ड ट्रंप यांच्यावर अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचाराकाळात गेल्या जुलै महिन्यात 20 वर्षीय युवक टॉम क्रूक्स याने गोळ्या झाडल्या होत्या. एका गोळीमुळे ट्रंप यांच्या कानाला जखम झाली होती. मात्र, ते या हल्ल्यातून सुदैवाने वाचले होते. या हल्ल्यात त्यांचे अंगरक्षक जखमी झाले होते तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे जगभरात मोठी खळबळ उडाली होती.









