वृत्तसंस्था / मॉस्को
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताच्या ‘मेक इन इंडिया’ योजनेची प्रशंसा केली आहे. ही योजना भारताला समर्थ राष्ट्र बनविण्यास साहाय्य ठरणार असून तिचा आदर्श रशियाही आपल्यासमोर ठेवेल, असे प्रतिपादन त्यांनी ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम या संघटनेच्या वार्षिक सत्रात व्लाडींव्होस्टोक येथे भाषण करताना केले. रशियाचे अधिकारीही यापुढे भारताच्या अधिकाऱ्यांप्रमाणे आपल्या देशात निर्माण झालेल्या रशियन कार्स उपयोगात आणतील. ते विदेशी ब्रँड्सच्या कार्सचा उपयोग करणार नाहीत, अशी घोषणा त्यांनी केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या देशातील नागरीकांना स्वदेशनिर्मित वस्तू आणि साधने यांचा उपयोग करण्यासाठी प्रेरित करीत आहेत. त्यांचे धोरण अतिशय योग्य आहे. रशियामध्ये आम्हीही या धोरणाचे अनुकरण करु, असे त्यांनी स्पष्ट केले.









