वृत्तसंस्था/ बीजिंग
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बुधवारी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली. मात्र, या चर्चेसाठी झेलेन्स्की यांना मॉस्कोमध्ये यावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की मॉस्कोमध्ये आले तरच आपण त्यांच्याशी थेट बोलण्यास तयार असल्याचे पुतिन यांनी म्हटले आहे. तथापि, अशा बैठकीचा काही फायदा होईल की नाही हे आत्ताच सांगता येणार नाही, असेही ते पुढे म्हणाले. पुतिन यांनी चीनच्या दौऱ्यादरम्यान हे विधान केले. तर शांतता कराराच्या अटींवर चर्चा करण्यासाठी झेलेन्स्की यांनी यापूर्वीच पुतिन यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. या चर्चेसाठी ते आता मॉस्कोला जातात की नाही हे पहावे लागेल. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही दोन्ही नेत्यांमधील बैठकीसाठी प्रयत्न केले होते. मात्र, चर्चेला मूर्त स्वरुप येत नसल्याने अद्याप दोन्ही देशातील संघर्ष कायम आहे.









