वारंवार अपघात होत असल्याने प्रवाशांची मागणी
उचगाव : उचगाव कोवाड या मार्गावर उचगाव फाटा ते बसुते क्रॉस या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर घातलेल्या गतिरोधकच्या ठिकाणी कोणताही फलक अथवा पांढरे पट्टे नसल्याने हेच गतिरोधक वाहन चालकांच्या अपघातास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे प्रवाशातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या रस्त्यावरून वाहने बेफाम धावत असल्याने अपघाताची मालिका सुरू झाली आहे. परिणामी सदर रस्त्यावर गतिरोधक घालण्यात यावे अशी मागणी केली होती. मागणीनुसार उचगाव फाटा ते बसुते क्रॉस या मार्गावर बांधकाम खात्याने तीन गतिरोधक घातले. परंतु गतिरोधकाच्या ठिकाणी कोणताही फलक अथवा पांढरे पट्टे किवा रिफ्लेक्टर बसविले नसल्याने वाहने जाताना गतिरोधकाचा अंदाज येत नसल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. अपघातात बरेच जण जखमी झाले आहेत. तरी तातडीने सार्वजनिक बांधकाम खात्याने या गतिरोधकवर पांढरे पट्टे आणि गतिरोधक असल्याचे फलक लावावेत अशी मागणी करण्यात येत आहे.









