राजन घाटे : पावसाळी अधिवेशनात ठराव घेण्याची मागणी – वाघ, म्हादईला वाचविण्यास पुढे येण्यासाठी गोमंतकीयांना आर्त हाक
प्रतिनिधी / पणजी
म्हादई ही राज्याची जीवनदायिनी. राज्यातील सर्व धर्माची व्यक्ती ही म्हादईवर अवलंबून आहे. या म्हादईच्या जीवावरच जंगलात सरपटणारे जीव, प्राणी ही गोव्याची मालमत्ता आहे. त्यामुळे वाघ व म्हादई नदीच्या रक्षणासाठी राज्यातील सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन वाघ व म्हादई वाचविण्यासाठी सरकारातील 40 आमदारांवर दबाव आणावा, असे आवाहन आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांनी केले आहे.
राजन घाटे, मारियानो फेर्रांव, डॉ. रिचर्ड फर्नांडिस, सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर, शंकर पोळजी, आम आदमी पक्षाच्या नेत्या अॅङ प्रतिमा कुतिन्हो यांनी मुख्यमंत्री कार्यालय, सभापती कार्यालय, उपसभापती कार्यालय व विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात विधानसभेत वाघ व म्हादई नदी वाचविण्यासंबंधीचा ठराव विधानसभेच्या पटलावर घेण्याची मागणी केली आहे.
राजन घाटे म्हणाले की, येत्या 29 जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन होत आहे. त्यापूर्वीच 18 जुलैला विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरवात होत आहे. या अधिवेशनात राज्यातील 40ही आमदारांनी वाघ वाचविण्यासाठी पुढाकार घेऊन व्याघ्र क्षेत्र जाहीर करण्याचा ठराव घ्यावा. हा ठराव घेतल्यानंतर तो केंद्राला सादर करावा, अशी आमची प्रमुख मागणी आहे. कारण म्हादई नदी आणि व्याघ्र क्षेत्र जाहीर होण्यातच गोव्याचे भले आहे. राज्यातील 40 ही आमदारांना खरेच गोव्याचे हित आणि काळजी असेल तरच सर्वांनी आमच्या मागणी सत्यात उतरावी, अन्यथा हे विद्यमान सरकार व विरोधी आमदार गोव्याच्या भल्यासाठी नव्हे, तर गोव्याची वाताहत करण्यासाठीच वावरत असल्याचे सिद्ध होणार आहे, असा आरोपही त्यांनी केला.
घाटे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री कार्यालय, सभापती व उपसभापती कार्यालय तसेच विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयातही वाघ व म्हादई नदीला वाचविण्यासाठी रितसर आमची मागणी निवदेनाद्वारे दिली आहे. यावर विचार होईल, अशी आमची अपेक्षा आहे. तसे न झाल्यार पुढील कृतीला गोव्यातील चाळीसही आमदार जबाबदार असतील असा इशाराही त्यांनी दिला.
दुहेरी रेल्वे मार्ग थांबणेही गरजेचे…
प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या, गोवा–कर्नाटक यांच्यातील महादयीचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, हे आपणास माहिती आहे. महादयी वन्यजीव अभयारण्य व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करावे यासाठी आम्ही लढा देत आहोत आणि गोवा सरकारला विनंती करत आहोत. आम्ही मोटार सायकल रॅलीद्वारे नगरपालिका, पंचायती आणि इतर स्थानिक संघटनांना कर्नाटक सरकारपासून महादयीला वाचवण्यासाठी उपाय म्हणून व्याघ्र प्रकल्पासाठी ठराव घेण्याची विनंती केली होती. कोळशाची वाहतूक बंद करणे आणि दुहेरी ट्रॅकिंग थांबवणे हा देखील चांगला उपाय आहे, यावर सरकारने आता खरेच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
राजन घाटे, माहिती हक्क अधिकाराचे कार्यकर्ते.
“आम्ही 16 मार्च 2023 रोजी सर्व आमदार आणि माननीय मंत्र्यांना चर्चेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे होते. परंतु याकडे राजकारण्यांनी पाठ फिरवली. आता आम्ही मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सर्व मंत्री आणि सर्व आमदारांना लेखी आवाहन आणि ईमेलद्वारे पत्र पाठवून येत्या पावसाळी विधानसभेत वाघ व म्हादई नदी वाचविण्यासंबंधीचा ठराव विधानसभेच्या पटलावर घेण्याची विनंती केली आहे.”
वन्यजीव व प्राणी हीही अमूल्य संपत्ती…. !
आम्ही सर्व मोगाचे गोंयकारांनो, आपल्या आमदारांना सामाजिक माध्यमांचा वापर करून पत्र पाठवून म्हादयी नदी, वन्यजीव अभयारण्याला महादयी व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यासाठी दबाव आणण्याबरोबच त्यांना जागे करण्याची आज खरंच गरज आहे. पिढ्यानपिढ्या आम्हाला म्हादयीने जगवले, वाढवले शिवाय यावर अवलंबून असलेले वन्यजीव व प्राणी हीही आमची अमूल्य संपत्ती आहे. सध्या म्हादई नदी व वाघ यांना धोका असल्याने त्यांचे रक्षण करण्यासाठी हीच योग्य वेळ असून, विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करण्यास जनतेने सरकारला भाग पाडावे, अशी आर्त हाक सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर व शंकर पोळजी यांनी दिली.









