इस्रायलची हमासला अंतिम ऑफर : गाझामधून बाहेर पडण्याची अनुमती देणार
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी हमास विरोधात निर्माण करण्यात आलेला दबाव यशस्वी ठरत असल्याचा दावा केला आहे. इस्रायलने शनिवारीच गाझामध्ये संघर्षविराम पुन्हा लागू करण्यासाठी इजिप्तच्या मध्यस्थांना एक नवा प्रस्ताव सोपविला आहे. एकदा संघर्षविराम लागू झाल्यावर स्वत:ची शस्त्रास्त्रs खाली ठेवण्याबद्दल सहमत झाल्यास हमासच्या नेत्यांना गाझा सोडण्याची अनुमती आम्ही देऊ असे नेतान्याहू यांनी सांगितले आहे.
हमासने स्वत:कडील शस्त्रास्त्रs खाली ठेवली तर त्याच्या नेत्यांना गाझा सोडण्याची अनुमती दिली जाईल. आम्ही गाझापट्टीत सामान्य सुरक्षा सुनिश्चित करू आणि ट्रम्प यांची योजना, स्वैच्छिक प्रवास योजना लागू करण्यास सक्षम होऊ असा दावा नेतान्याहू यानी केला आहे.
तर हमासने एका प्रस्तावावर शनिवारी सहमती दर्शविली. या प्रस्तावानुसार संघर्षविरामाच्या बदल्यात दर आठवड्याला पाच इस्रायली ओलिसांची मुक्तता करण्यात येणार आहे. परंतु हमासने शस्त्रास्त्रs खाली ठेवण्यास नकार दिला आहे. तर मुस्लिमांच्या सणाच्या आदल्या दिवशी इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये कमीतकमी 20 जण मारले गेल्याची माहिती हमासच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
इस्रायलने 18 मार्चपासून गाझामध्ये स्वत:चे हल्ले पुन्हा सुरू केले असून यात शेकडो पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. तर हजारो पॅलेस्टिनींना उत्तर गाझाच्या क्षेत्रांमधून स्थलांतर करावे लागले आहे. हे पॅलेस्टिनी जानेवारी महिन्यात संघर्षविरामानंतर येथे परतले होते.
इस्रायलने हमासच्या सैन्य आणि प्रशासकीय क्षमतांना नष्ट करण्याच्या स्वत:च्या लक्ष्याची पुष्टी केली आहे. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील पूर्ण 23 लाख लोकसंख्येला इजिप्त आणि जॉर्डन समवेत शेजारी देशांमध्ये पाठविणे आणि गाझापट्टीला अमेरिकेच्या मालकीतील रिसॉर्ट म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. तर इस्रायलच्या सैन्य आणि गुप्तचर विभागाने प्रारंभी या प्रस्तावाच्या व्यवहार्यतेवर संशय व्यक्त केला होता, परंतु नंतर नेतान्याहू सरकारने या प्रस्तावाचे पूर्ण समर्थन करत यात रुची दाखविली होती.









