बेळगाव : शहरात विविध ठिकाणी धोकादायक स्थितीतील ड्रेनेज चेंबरकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. शहरातील मुख्य रहदारीचा रस्ता असलेल्या क्लब रोडवर ड्रेनेज चेंबरवरील झाकण मोडले आहे. पण ते बदलण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. झाकण बदलण्याऐवजी त्यावर झाडाची फांदी व पेव्हर्स ठेवले आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यानंतरच महापालिकेला जाग येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. भातकांडे स्कूलसमोरील रस्त्यावर दोन ठिकाणी धोकादायक स्थितीत ड्रेनेज चेंबर होते.
मात्र सदर झाकणे बदलण्याकडे दुर्लक्ष केल्याने तरुण भारतने बातमी प्रसिद्ध करताच जागे झालेल्या मनपाने नवीन झाकणे बसविली. अशाप्रकारे शहरात विविध ठिकाणी धोकादायक ड्रेनेज चेंबर आहेत. क्लब रोडवरील लोकायुक्त पोलीस स्थानकापासून कांही अंतरावर ड्रेनेजचे झाकण मोडले आहे. हा रस्ता वर्दळीचा आहे. दिवसा व रात्रीच्या धोकादायक चेंबरचा अंदाज येत नसल्याने चालकांना धोका निर्माण झाला आहे. पण झाकण बसविण्याऐवजी तेथे पेव्हर्स व झाडाची फांदी ठेवली आहे. या गंभीर समस्येकडे मनपाने लक्ष देऊन तातडीने चेंबरवर नवीन झाकण बसवावे, अशी मागणी आहे.









