काठमांडू / वृत्तसंस्था
पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ यांचा नेपाळच्या पंतप्रधानपदी शपथविधी झाला आहे. ते तिसऱयांदा नेपाळचे पंतप्रधान बनले आहेत. या देशाच्या अध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांनी त्यांना पंतप्रधानपदी नियुक्त केले. त्यांनी नेपाळच्या संसदेत 169 सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र अध्यक्षांना सादर केल्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली.
दहल हे पूर्वीचे माओवादी नेते आहेत. ते 68 वर्षांचे असून त्यांच्या तारुण्यात ते सलग 13 वर्षे भूमीगत होते. 1996 पासून 2016 पर्यंत त्यांनी सरकारविरोधात सशस्त्र संघर्ष केला होता. नंतर त्यांनी सरकारशी नोव्हेंबर 2006 मध्ये शांतता आणि शस्त्रसंधी करार केला होता. या देशाचे मावळते पंतप्रधान शेरबहादूर देऊबा यांनी प्रचंड यांचे अभिनंदन केले. देऊबा यांच्याच सरकारमधून प्रचंड यांचा पक्ष बाहेर पडला होता. आता त्यांनीच सरकार स्थापन केले आहे.









