परिवहनच्या ताफ्यात नादुरुस्त बस : रस्त्यात बंद पडण्याच्या प्रमाणात वाढ
बेळगाव : परिवहनच्या जुन्या बसेस वाहतुकीदरम्यान रस्त्यात बंद पडण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक विस्कळीत होऊ लागली आहे. परिवहनच्या ताफ्यात बसेसची कमतरता असल्याने जुन्या बसवरच प्रवास सुरू आहे. त्यामुळे हे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. बसगाड्या रस्त्यातच नादुरुस्त होत असल्याने धक्के द्यावे लागत आहेत. बस वाहतुकीवर जुन्या बसचा परिणाम होत असून, सुस्थितीत असलेल्या बसेस पाठवाव्यात, अशी मागणी होत आहे. बेळगाव विभागात दैनंदिन 650 हून अधिक बसेस विविध मार्गावर धावतात. यामध्ये आयुर्मान संपलेल्या बसेसची संख्यादेखील अधिक आहे. मात्र या बसेस दुरुस्त करून त्याच वापरल्या जातात. त्यामुळे नादुरुस्तीचे प्रमाण वाढू लागले आहे. दरम्यान गतवर्षी बीएमटीसीकडून 25 जुन्या बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. या बसेसची तक्रारीदेखील वाढू लागल्या आहेत. भर रस्त्यात बंद पडणे, टायर पंक्चर होणे, ब्रेकफेल होणे, आदी समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे जुन्या बसचा धोकादायक प्रवास कधी थांबणार? असा प्रश्नदेखील प्रवाशांना पडू लागला आहे.
10 लाख किलोमीटर धावलेल्या बसेस दुरुस्त करून पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या आहेत. त्यामुळे रस्त्यात बसेस बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. परिणामी धक्का देऊन बसेस बाजूला घ्याव्या लागत आहेत. दरम्यान वाहतुकीची कोंडीदेखील होऊ लागली आहे. किरकोळ दुरुस्ती आणि मॉडीफिकेशन करून या बसेस वापरल्या जात आहेत. त्यामुळे रस्त्यात सातत्याने बंद पडू लागल्या आहेत. कोरोना काळात परिवहनला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे नवीन बस खरेदी करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे परिवहनने केवळ 1 लाख रुपये देऊन बीएमटीसीकडून जुन्या बसेस खरेदी केल्या आहेत. याच बसेस भर रस्त्यात बंद पडू लागल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी नादुरुस्त बसेसची दुरुस्ती करणे आवश्यक होते. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने नादुरुस्त बसेसची प्रमाण वाढले आहे. विशेषत: ग्रामीण आणि शहरी भागात जुन्या बसेस पाठविल्या जात आहेत. मात्र रस्त्यात या बसेस बंद पडू लागल्याने प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत. इच्छितस्थळी जाण्यासाठी प्रवाशांना पुन्हा दुसऱ्या वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे परिवहनची डोकेदुखीदेखील वाढू लागली आहे.
तक्रारीत वाढ …: के. के. लमाणी, विभागीय संचार अधिकारी
बेळगाव विभागात बसेसची कमतरता आहे. शिवाय शासनाकडूनदेखील अनुदान मिळाले नाही. त्यामुळे गतवर्षी बीएमटीसीकडून काही जुन्या बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. बेळगाव विभागातील जुन्या बसेस दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र काही बसेस जुन्या असल्याने तक्रारी वाढत आहेत.









