जिह्याला 10 सप्टेंबरपर्यंत पावसाचा ‘यलो अलर्ट’
प्रतिनिधी/ रत्नागिरी
सध्या रत्नागिरी शहरात पावसाचा व उन्हाचा खेळ सुरु आहे. मध्येच पडणारी पावसाची सर आणि अचानक होणारे उन्हाचे दर्शन यामुळे भाद्रपदात रत्नागिरीकर श्रावणसरींचा अनुभव घेत होते. दरम्यान रत्नागिरी जिह्यासाठी कुलाबा वेधशाळेकडून 6 ते 10 सप्टेंबरदरम्यान पावसाचा पिवळा इशारा देण्यात आला आहे. यामुळे पावसाच्या पूर्वा नक्षत्राचा वाहन असलेल्या ‘मेंढय़ा’ची जिह्यात चौफेर बरसात ती सुध्दा वादळी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
वेधशाळेकडून प्राप्त माहितीनुसार, 7 सप्टेंबर रोजी विजांच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगड़ाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 8 ते 10 सप्टेंबरदरम्यान जिह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जिह्यात मिश्र स्वरुपाचे वातावरण पहायला मिळत आहे. यंदा पावसाचे प्रमाण महिनागणिक बदलत गेले. कधी कमी-कधी जास्त स्वरुपात पाऊस बरसल्याने आणि नंतर पाऊस गायब झाल्याने यंदा परतीच्या पावसाला लगेच सुरुवात होणार की काय, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र काही दिवसांपूर्वी हवामान विभागाच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात उकाडय़ासोबत पावसाचे प्रमाणही अधिक असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र ऑगस्टची अखेर होता-होता पावसाने पुरती पाठ फिरवली. तसेच सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही जिह्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र इतरवेळी कडकडीत उन होते. त्यामुळे ऐन सप्टेंबरमध्ये ऑक्टोबर हिटचा अनुभव येत होता.
काहे दिवसांपूर्वी जिह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र त्या तुलनेत रत्नागिरी शहरात पावसाने ओढ दिल्याचे चित्र आहे. ठिकठिकाणी तयार होण्याच्या स्थितीत असणारे भातपीक पावसाच्या गैरहजेरीने करपायला लागले आहे. जिल्हावासियांना पावसाची आतुरतेने प्रतीक्षा होती. दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पावसाने हजेरी लावल्यास मान टाकलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. आता तर परतीच्या पावसाचे पूर्वा नक्षत्र सुरू आहे. हे नक्षत्र 12 सप्टेंबरला संपणार आहे. पण याच नक्षत्रात जिह्याला पावसाचा पिवळा इशारा (यलो अलर्ट) असल्याने प्रशासनाच्यावतीने जिल्हावासियांना सावधानता व खबरदारी बाळ्गण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वादळी वाऱयासह पाऊस पडण्याची जोरदार शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यंदा 15 दिवस आधीच पाऊस निरोप घेण्याची शक्यता आहे. तर राज्यात गणेश उत्सवाची धूम असताना आता मुंबई हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ातच मान्सून परतीचा प्रवास सुरू करेल, अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. एकंदरीत मान्सूनचा प्रवास 17 सप्टेंबरपासून सुरू होतो आणि 30 सप्टेंबरपर्यंत मान्सून निरोप घेतो. यंदा मान्सून लवकर जाणार असल्याची माहिती हवामान विभागाने वर्तवली आहे. आता पावसाच्या स्वरुपात बदल होत आहे. तर जुलै, ऑगस्ट महिन्यात राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती.
चिपळुणातील गटारांचे पाणी रस्त्यांवर
चिपळूण ः गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने मंगळवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. त्यामुळे व्यापाऱयांसह परतीचा प्रवास करणाऱया चाकरमान्यांची धावपळ उडाली. शहरातील विविध भागात गटारांचे पाणी रस्त्यांवर आल्याने त्यातून वाहने काढताना चालकांना मोठी कसरत करावी लागली.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. केवळ अधूनमधून किरकोळ सरी कोसळत होत्या. त्यामुळे गणपती बाप्पा, गौरीचे पावसाच्या गैरहजेरीत आगमन व दीड दिवस, पाच दिवसांच्या गणरायांचे विसर्जन पार पडले. त्यामुळे चाकरमान्यांनी मंगळवारपासून परतीचा प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे बसस्थानक, खासगी बसेस सुटणारे परिसर गर्दीने फुलून गेले आहेत. अशातच दुपारी विजाच्या कडकडाटासह पाऊस आल्याने या चाकरमान्यांची मोठी धांदल उडाली. तर गणेशोत्सवानिमित्त रस्त्यांवर व्यवसाय थाटणाऱयांचेही साहित्य भिजले. शहरातील अनंत आईस फॅक्टरी, लोकमान्य टिळक वाचन मंदिर आदी भागात गटारांचे पाणी रस्त्यांवर आल्याने त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. त्यानंतर सायंकाळी मात्र पावसाने विश्रांती घेतली. येथे मंगळवार दुपारपर्यंत 9 मि.मी तर आतापर्यंत 309ाdन7 मि.मी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.









