रत्नागिरी :
कोकण किनारपट्टीवर सध्या ‘डमी फिशिंग’ची जोरदार चर्चा आहे. मासे पकडणारा वेगळा आणि पकडलेल्या मासळीवर आपला हक्क सांगून ती किनाऱ्यावर नेणारा वेगळा असा प्रकार जोरात सुरु आहे. या डमी फिशिंगला अवैध पर्ससीन मासेमारीचा वाढला अतिरेक कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. कारवाईचा बडगा नको म्हणून अवैध पर्ससीनवाले जाळ्यात आलेली मासळी पारंपरिक मच्छीमारांना ठराविक प्रमाणात वाटत असून यानिमित्ताने ‘पर्ससीन व पारंपरिक’ यांच्यात अनोखे मैत्रीपर्व पहावयास मिळत आहे. या मैत्रीपर्वामुळे मत्स्य विभागाची मानसिकता काहीशी ‘सुंठीवाचून खोकला गेला’ अशी झाली असली तरी भविष्यात या डमी फिशिंगमुळे समुद्रात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही ना याची खबरदारी मात्र प्रशासनाला नक्कीच घ्यावी लागणार आहे.
अवैध पर्ससीन मासेमारीवर मत्स्य विभागाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने कोकणातील पारंपरिक मच्छीमार प्रचंड हताश आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण आंदोलनानंतर मासेमारीचे नवे नियम आले असले तरी प्रत्यक्षात परिस्थितीत काहीच बदल होत नसल्यामुळे त्यांचे नैराश्य वाढले आहे. वारंवार मागणी करूनदेखील मत्स्य विभाग अवैध पर्ससीन नौकांना रोखू शकत नाहीय. ‘मग आपण करायचे तरी काय, पोट तर भरले पाहिजे’ या चिंतेने ग्रासलेले सिंधुदुर्गातील पारंपरिक मच्छीमार आता अवैध मासेमारी करणाऱ्या पर्ससीन ट्रॉलर्सनाच समुद्रात गाठु लागले आहेत. राज्य शासनाने सिंधुदुर्ग व रत्नागिरीत एकाही पर्ससीन नौकेला परवाना दिलेला नाही. नेमकी हीच बाब हेरून ते १२ सागरी मैलाच्या आत मासेमारी करणाऱ्या पर्ससीन नौकांना घेरून त्यांच्याकडे थेट बांगडा मासळीची मागणी करत आहेत
- कारवाईचा बडगा नको म्हणून…
कारवाईचा बडगा नको म्हणून पर्ससीनधारकही एकाचवेळी चार ते पाच आऊटबोर्ड पारंपरिक मच्छीमारांना प्रत्येकी चारशे ते आठशे किलोपर्यंत बांगडा मासळी देऊन आपला मासेमारीचा मार्ग मोकळा करून घेत आहेत. पर्ससीनधारक यांगडा मासळी देण्यासाठी वारंवार सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचे लक्षात येताच मासळी नेण्यासाठी येणाऱ्या पारंपरिक मासेमारी नौकांचे प्रमाण वाढू लागलेय. अशावेळी मासळी मिळवण्यावरून पारंपरिक मच्छीमारांमध्येही भर समुद्रात काही किरकोळ वादाचे प्रसंग उद्भवले आहेत. पण ते फार टोकाला गेलेले नाहीत.
- …. अन् पर्ससीनचे अतिक्रमण झाले दूर
पारंपरिक नौकांच्या वाढत्या संख्येमुळे पर्ससीनधारकही प्रचंड हैराण झाले आहेत. ‘सर्वच नौकांना जर आपण अशी मासळी देत राहिलो तर आपल्याला काय उरणार’ हा पेच त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
यातून स्वतःची सुटका म्हणून या अवैध पर्ससीनधारकांनी आपला मोर्चा सिंधुदुर्गातून अन्यत्र वळविला आता आहे. विशेषकरून मालवण तालुक्यासमोरील समुद्रात पर्ससीन नौकांचा वावर कमी झाला आहे. डमी फिशिंगमुळे एकप्रकारे पर्ससीनचे अतिक्रमण दूर झाले आहे. साहजिकच पर्ससीनची मासळी मिळवण्यासाठी समुद्रात तळ ठोकणारे पारंपरिक मच्छीमार नेहमीप्रमाणे आपल्या नौकेतील जाळी समुद्रात फेकून मासे पकडायला सज्ज झाले आहेत. आपले डावपेच यशस्वी झाल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटले आहेत.
- कायदेशीर कारवाईची घातली जातेय भीती पण…
दरम्यान, डमी फिशिंगवरून काहींनी पारंपरिक मच्छीमारांना त्रयस्थांमार्फत कायदेशीर कारवाईची भीती घालण्याचा जुना फॉर्म्युला वापरायला सुरुवात केल्याचे कळते. परंतु, पर्ससीनधारक तरी नियमात कुठे आहेत. राज्य शासनाने रत्नागिरी व सिंधुदुर्गातील एकाही पर्ससीनला परवाना दिलेला नाही. असे असताना या बेकायदेशीर पर्ससीन नौका मासेमारीस जातातच कशा. नियमबाह्य मासेमारी करणाऱ्या या नौकांना जर शासनाकडून रोखले गेले तर डमी फिशिंगसारखे प्रकार होणारच नाही, असा सूर कोकण किनारपट्टीवर आहे.








