महानगरपालिकेच्या कारवाईने संताप : न्यायालयात लढाई लढण्याचा इशारा
बेळगाव : गणपत गल्ली येथील पुरोहित स्वीटमार्ट दुकानाला महानगरपालिकेने मंगळवारी टाळे ठोकले आहेत. न्यायालयाने आदेश दिला म्हणून आम्ही टाळे ठोकत आहे, असे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित दुकान मालकांना सांगितले. यावेळी दुकान मालकांनी न्यायालयाच्या आदेशाची प्रत मागितली. त्यानंतर मनपाच्या कर्मचाऱ्यांनी आयुक्तांनी आम्हाला तोंडी सूचना केली आहे. त्यानुसार कारवाई करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गणपत गल्ली येथे दिनेश राजपुरोहित यांचे पुरोहित स्वीटमार्ट आहे. या गाळ्याचा वाद न्यायालयात आहे. उच्च न्यायालयातही खटला सुरू आहे. याचबरोबर जिल्हा न्यायालयातही खटला सुरू असल्याची माहिती दिनेश राजपुरोहित यांनी दिली. असे असताना अचानकपणे महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांनी येऊन टाळे ठोकले आहेत, हे बेकायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला कोणत्याही प्रकारची नोटीस पाठविण्यात आली नाही. अचानकपणे अशाप्रकारे आमच्या दुकानाला टाळे ठोकले आहेत. त्यामुळे आमचे मोठे नुकसान झाले असून त्याविरोधात पुन्हा न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत महापालिकेचे कायदा सल्लागार अॅड. महांतशेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही या कारवाईबाबत मला कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे. एकूणच या कारवाईमुळे व्यापारीवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.









