भांडारातील मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवणार
वृत्तसंस्था /पुरी
जगप्रसिद्ध जगन्नाथ पुरीच्या मंदिराचे रत्नभांडार गुरुवारी पुन्हा उघडण्यात आले आहे. या भांडारातील मौल्यवान वस्तू सुरक्षित स्थानी ठेवल्या जाणार आहेत. त्यासाठी ते पुन्हा उघडण्यात आले, अशी माहिती मंदिराच्या व्यवस्थापनाने दिली आहे. एका आठवड्यात हे भांडार उघडण्याची ही दुसरी वेळ आहे. भगवान जगन्नाथ आणि त्यांची भावंडे यांची पूजा भांडार उघडण्यापूर्वी करण्यात आली. त्यानंतर मंदिराच्या व्यवस्थापनाने एका देखरेख समितीची स्थापना केली.
या समितीच्या अधिपत्यात या भांडारातील मौल्यवान वस्तू आणि आभूषणे सुरक्षित लॉकरमध्ये ठेवली जाणार आहेत. हे रत्न भांडार 46 वर्षांपूर्वी उघडण्यात आले होते. यंदा ते पुन्हा उघडण्यात आले. मौल्यवान वस्तू सुरक्षित स्थानी नेण्याच्या कार्याचा प्रारंभ करण्यात आला आहे. हे कार्य गुरुवारीच रात्रीपर्यंत पूर्ण झाले होते. मात्र, काही औपचारिकता पूर्ण करण्यासाठी ते शुक्रवारीही पेले जाणार आहे. सर्व मौल्यवान वस्तू सुरक्षितपणे हलविण्यासाठी योजना करण्यात आली होती. सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा सैनिकांची नियुक्ती करण्यात आली होती. गुरुवारी सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मंदिरात येणाऱ्या भक्तांची संख्या मर्यादित करण्यात आली होती, अशी माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली.









