बेंगळूरमधील कर्नाटक विधानसभेच्या इमारतीबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडून आणि पूजा करण्याचा व्हिडीय़ो सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. नवनिर्वाचित काँग्रेस सरकारचे पहिलेच अधिवेशन सुरु होण्यापूर्वी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी विधानसभा इमारतीचे ‘शुद्धीकरण’ करत असल्याचा दावा केला आहे. सोशल मीडीयावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, काँग्रेस कार्यकर्ते गोमुत्राने भरलेली एक बादली घेऊन जात असून त्यामध्ये पाने बुडवून ती विधानसभा परिसरात शिंपडताना दिसत आहेत.
दरम्यान, बुधवारी नवीन कर्नाटक विधानसभेच्या पहिल्या सत्रामध्ये, राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी निवडून आलेल्या आमदारांना शपथ दिली आहे. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर. व्ही. देशपांडे यांची नवीन प्रोटेम स्पीकर म्हणून निवड करण्यात आली आहे.
या तीन दिवसीय अधिवेशनाची घोषणा करताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले कि, “आम्ही विधानसभेचे अधिवेशन सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस बोलावत आहोत. तसेच राज्यपालांना आम्ही विनंती करत आहोत. कारण नवीन विधानसभेची स्थापना 24 मे पूर्वी होणे गरजेचे आहे.” असे ते म्हणाले.