ओव्हरहेड वायरला आग; प्रवासी थोडक्यात बचावले
वृत्तसंस्था/ जमुई
हावडा-दिल्ली मुख्य रेल्वेमार्गावर शुक्रवार, 3 नोव्हेंबर रोजी सकाळी मोठा अपघात टळला. पुरी-जयनगर एक्स्प्रेस (18419) जमुईच्या सिमुलतला रेल्वे स्थानकाजवळ पोहोचली असताना ओव्हरहेड वायरला आग लागल्याचा प्रकार निदर्शनास आला. मात्र, अतिवेगामुळे इंजिनचालक एक्स्प्रेस रोखू शकला नाही. तरीही सुदैवाने एक्स्प्रेस आगीच्या विळख्यात न सापडल्याने टेनमधून प्रवास करणारे प्रवासी थोडक्मयात बचावले. आगीच्या ज्वाळांमधून एक्स्प्रेस सुखरुप पुढे आल्याने इंजिन चालकानेही सुटकेचा नि:श्वास टाकला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ओव्हरहेड वायरला आग लागल्यामुळे गावातील लोक एक्स्प्रेस थांबवण्यासाठी ओरडत होते. हाताने इशारा करून ते एक्स्प्रेस थांबवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र वेग जास्त असल्याने आगीच्या भडक्यातून रेल्वे पुढे गेली. याप्रसंगी पुरी-जयनगर एक्स्प्रेसमध्ये एकूण 18 डबे होते. त्यात सुमारे 1100 ते 1300 प्रवासी प्रवास करत होते. या घटनेनंतर हावडा-नवी दिल्ली मुख्य रेल्वेमार्ग पूर्णपणे प्रभावित झाला. घटनेची माहिती रेल्वे इंजिनचालक आर. बेसरा यांनी स्टेशन मास्तर महेश कुमार यांना दिल्यानंतर ओव्हरहेड वायरवरून वीज कनेक्शन कापण्यात आले. सकाळी 6.15 वाजल्यापासून रेल्वे वाहतूक प्रभावित झाली. 6-7 तास रेल्वे वाहतूक ठप्प राहिल्यानंतर वेगवेगळ्या स्थानकांवर गाड्या अडकून पडल्या. दुपारी 1 वाजल्यापासून रेल्वे वाहतूक सुरू झाल्यानंतर सेवा पूर्वपदावर आली होती.









