बेंगळूर : परतीच्या पावसामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. मंगळवारपासून आधारभूत दराने सोयाबिन, सूर्यफूल बिया आणि मूग खरेदीला प्रारंभ झाला आहे. कृषी बाजारपेठ आणि साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वर ही माहिती दिली आहे. राज्यात सोयाबिन, मूग आणि सूर्यफूल बिया आधारभूत दराने खरेदी करण्यासाठी राज्यभरात खरेदी केंद्रे उघडण्यात आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
सोयाबीन खरेदीसाठी 206 खरेदी केंद्रे उघडण्यात आली असून 19,325 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. बेळगाव जिल्ह्यात 3,047 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तर बिदर जिल्ह्यात 13,033 आणि धारवाड जिल्ह्यात 2,164 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मूग खरेदीसाठी एकूण 211 खरेदी केंद्रे उघडण्यात आली असून 5,341 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. धारवाड जिल्ह्यात सर्वाधिक 6,362 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
सूर्यफूल बिया खरेदीसाठी 120 केंद्रे
सूर्यफूल बिया खरेदीसाठी सरकारने 120 खरेदी केंद्रे सुरू केली असून एकूण 5,341 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. उडीद खरेदीसाठी 134 खरेदी केंद्रे सुरू केली असून 5,274 शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याची माहिती मंत्री शिवानंद पाटील यांनी दिली आहे.









