बाजारात सोले, वांगी अन् वाटाण्यालाही पसंती
बेळगाव : भोगी आणि मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर रविवारी बाजारात खरेदीची लगबग पाहावयास मिळाली. विशेषत: सोले, वांगी, वाटाणे, लाल भाजी, कांदा पात आदी भाज्यांची खरेदी झाली. रविवारचा सुटीचा दिवस असल्याने गृहिणींसह नागरिकांची बाजारात वर्दळ वाढली होती. भोगीच्या पार्श्वभूमीवर भाजीपालाही तेजीत असल्याचे दिसून आले. सोमवारी भोगी तर मंगळवारी मकरसंक्रांतीचा सण आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात तिळगूळ आणि विविध भाज्यांना मागणी वाढली आहे. वांगी 60 रु. किलो, सोले 60 रुपये गिरपाव, लाल भाजी 15 रुपये 1 पेंडी, कांदा पात 20 रु. 3 पेंडी, लहान वाटाणा 200 रु. किलो, गाजर 80 रु. किलो, काकडी 80 रु. किलो, घेवडा 30 रु. पाव किलो असा दर आहे. विशेषत: भोगीदिवशी वेगवेगळ्या भाज्या केल्या जातात. यासाठी रविवारी भाज्यांना पसंती मिळाली. भाज्यांचे दरही वाढलेले पाहावयास मिळाले.
भाकरी-चटण्यांची खरेदी
भोगीसाठी बाजारात विविध भाज्यांबरोबर शेंगदाणे, काळे तिळ, खोबऱ्याची चटणी, तिळ भाकरी आदी विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. गृहिणींसह नागरिकांकडून विविध चटण्यांची खरेदी होऊ लागली आहे. मकरसंक्रांतीच्या सणाला विविध प्रकारच्या भाकऱ्या आणि चटण्यांना विशेष महत्त्व दिले जाते. यासाठी बाजारात विविध भाकऱ्या आणि चटण्यांची विक्री होऊ लागली आहे.









