दक्षिणेतील ‘सुषमा स्वराज’ अशी ओळख : पक्षाच्या पहिल्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष ठरण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम
भाजपकडून मार्चच्या मध्यापर्यंत स्वत:च्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा केली जाणार आहे. हा निर्णय पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांनंतर घेतला जाणार आहे. भाजप सध्या 13 हून अधिक राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुकांमध्ये व्यग्र आहे. पक्षाच्या नव्या अध्यक्षाची निवड अंतर्गत सहमतीने केली जाणार आहे. भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या महिलेला राष्ट्रीय अध्यक्ष केले जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तसेच दक्षिण भारतातील एखाद्या महिला नेत्याला ही जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
भाजप जर एखाद्या महिला नेत्याला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडत असले तर महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि कोइम्बतूरच्या आमदार वनथी श्रीनिवासन किंवा आंध्रप्रदेश भाजप प्रदेशाध्यक्ष दग्गुबाती पुरंदेश्वरी यांना या पदासाठी सर्वात संभाव्य उमेदवार मानले जात आहे. दग्गुबाती पुरंदेश्वरी यांची दावेदारी या पदासाठी सर्वाधिक आहे. 66 वर्षीय पुरंदेश्वरी यांनी 2014 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि संघटनात्मक प्रकरणांमध्ये त्यांना महत्त्वपूर्ण अनुभव आहे. सद्यकाळात त्या आंध्रप्रदेश भाजपच्या अध्यक्ष असून एक प्रभावी नेत्या म्हणून त्यांना ओळखले जाते. तसेच आंध्रप्रदेशातील दिग्गज नेते एन.टी. रामाराव यांच्या कन्या असल्याने त्यांना कौटुंबिक करिष्माही प्राप्त आहे. याचबरोबर त्यांची पक्षाध्यक्ष म्हणून निवड केल्यास आंध्रचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्याकडून विरोध होण्याची शक्यता कमी आहे. कारण चंद्राबाबू आणि पुरंदेश्वरी यांचे कौटुंबिक नाते आहे.
सुषमा स्वराज यांच्याशी तुलना
पुरंदेश्वरी यांना ‘दक्षिण भारतातील सुषमा स्वराज’ म्हणूनही ओळखले जाते. त्यांची प्रभावी वक्तृत्वक्षमता आणि 5 भाषांमधील प्रावीण्यामुळे त्यांना भाजपच्या समर्थकांमध्ये व्यापक स्वीकृती प्राप्त आहे. तर वनथी श्रीनिवास यांना पक्षाचे रणनीतिकार तसेच गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून अलिकडेच आयोजित कार्यक्रमांमध्ये सामील होताना पाहिले गेले होते. वनथी यांना राष्ट्रीय महिला मोर्चाच्या अंतर्गत अनेक यशस्वी कार्यक्रम आयोजनासाठी ओळखले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अमित शाह यांच्याकडून त्यांच्यावर भरवसा केला जातो असे एका वरिष्ठ भाजप नेत्याने सांगितले आहे.
खट्टर यांचे नाव मागे पडले
पक्षाच्या नव्या अध्यक्षाची निवड 50-70 वयोगटातील नेत्याद्वारे होणार आहे. यामुळे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री अन् वर्तमान केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर या शर्यतीतून बाहेर पडणार आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान देखील पक्षाध्यक्ष पदाच्या शर्यतीत असल्याचे बोलले जात आहे. भाजपने जर महिला नेत्याची पक्षाध्यक्ष म्हणून निवड न केल्यास धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव आणि विनोद तावडे हे संभाव्य उमेदवार असू शकतात.
निवडणुकांचा विचार करून निर्णय
उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम आणि गुजरातमध्ये पुढील काही वर्षांमध्ये विधानसभा निवडणूक आहे आणि पक्ष या राज्यांच्या निवडणुकीचा विचार करत उमेदवारांच्या नावांवर विचार करत आहे. यातील उत्तरप्रदेश अन् पश्चिम बंगाल तसेच गुजरातमधील नेत्याची पक्षाध्यक्ष म्हणून निवड होण्याची शक्यता कमी आहे. तर तामिळनाडूतून वनथी श्रीनिवासन यांचे नाव मात्र चर्चेत राहिले आहे. परंतु पुरंदेश्वरी यांना हे पद मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.









