छायाचित्राची पोस्ट झाली व्हायरल
निसर्ग अनेकदा अशी दुर्लभ दृश्यं दाखवितो, ज्याची कुणी कल्पनाही केलेली नसते. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या चीनच्या एका पर्वताच्या छायाचित्रातही देखील असेच दृश्य दिसून येते. चीनच्या यिचांगमध्ये यांग्त्जी नदीच्या काठावर एक ‘पप्पी’सारखा पर्वत दिसतो. याचे छायाचित्र डिझाइनर गुओ किंगशान यांनी स्वत:च्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
या छायाचित्राला प्रचंड लोकप्रियता मिळाल्याने आता हे ठिकाण लोकांसाठी पर्यटनस्थळ ठरले आहे. हे केवळ सोशल मीडियाच्या शक्तीमुळे शक्य झाले आहे. श्वानाच्या डोक्यासारख्या दिसणाऱ्या पर्वताने इंटरनेट युजर्सना मंत्रमुग्ध केले आहे. शांघाय येथील डिझाइनर गुओ किंगशान यांनी ही पोस्ट शेअर केली होती. त्यांनी या आतापर्यंत कुणाच्या लक्षात न आलेल्या दृश्याला सोशल मीडियाद्वारे चर्चेत आणले आहे. गुओ यांनी स्वत:च्या सुटीदरम्यान हे छायाचित्र पोस्ट केले होते. यात एक पर्वत एका श्वानाच्या डोक्याच्या आकारासारखा दिसून येतो. नदीच्या काठावर पहुडलेल्या श्वानासारखे हे दृश्य आहे.
चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या छायाचित्राला कोट्यावधी लाइक्स प्राप्त झाल्या आहेत. झियागोशान या हॅशटॅगसह या पोस्टला लाखो लोकांनी पाहिल्याने ते अत्यंत लोकप्रिय ठरले. हॅशटॅग झियागोशानचा चिनी भाषेतील अर्थ ‘पप्पी माउंटेन’ असा होतो. गुओच्या पोस्टनंतर अन्य लोकांनी देखील या पर्वताची छायाचित्रे शेअर करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे या ठिकाणी येणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. पर्वताचा हा आकार मागील काही वर्षांमध्ये नैसर्गिक धूप आणि अन्य भौगोलिक कारणांमुळे तयार झाल्याचे स्थानिक लोकांचे सांगणे आहे.









