प्रतिनिधी /पणजी
भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने खनिजाच्या निर्यात शुल्कात केलेल्या प्रचंड वाढीवर आम आदमी पक्षाने सोमवारी जोरदार टीका केली. निर्यात शुल्काच्या वाढीवर प्रतिक्रिया देताना आपचे नेते ऍड. अमित पालेकर म्हणाले की, अगदी कमी दर्जाच्या धातूवरही 50 टक्के शुल्क म्हणजे गोव्यातील खाण उद्योगासाठी मृत्यूचा सापळाच आहे.
गोव्यातील बहुतेक धातू कमी दर्जाचे आहेत, ज्यावर आतापर्यंत निर्यात शुल्क आकारले जात नव्हते. तथापि, अचानक 50 टक्के शुल्क लागू केल्याने, कमी दर्जाचे धातू काढणे आर्थिकदृष्टय़ा व्यवहार्य होणार नाही. यामुळे संपूर्ण उद्योगाला काही मोजक्मया खासगी कंपन्यांच्या दयेवर राहावे लागणार आहे. आमची नैसर्गिक संसाधने काही निवडक लोकांकडे वळवण्याची भाजपची ही आणखी एक कृती आहे. सध्याच्या प्रस्तावामुळे खासगी कंपन्यांची भविष्यात मक्तेदारी पाहायला मिळेल. भाजपच्या या निर्णयामुळे गोवा आणखीन संकटात सापडेल. मुख्यमंत्री प्रमोद सावंत खाणपट्टी भागातून निवडून येऊनही गोव्यातील खाणप्रश्न सोडविण्यासाठी सपशेल अपयशी ठरले आहेत, अशी टीका पालेकर यांनी केली.
डॉ. सावंत दर आठवडय़ाला दिल्लीहून ये जा करताना दिसतात. गोव्याच्या असंख्य प्रश्नांसाठी मदत मिळवण्यासाठी की गोव्याची संसाधने मोदी सरकारच्या खासगी मित्रांना विकण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला जातात? असा प्रश्न पालेकर यांनी उपस्थित केला.









