दाबोळी पोलिसांना चकवा, पहाटेची घटना, दोन पोलीस निलंबित
प्रतिनिधी/ वास्को
शारजाला प्रयाण करण्यासाठी दाबोळी विमानतळावर दाखल झालेला पंजाबमधील एक गुन्हेगार दाबोळी पोलिसांना चकवा देऊन पसार होण्याची घटना शनिवारी पहाटे घडली. पंजाब पोलिसांना हवा असलेल्या या गुन्हेगाराला दाबोळी विमानतळावरील परदेशगमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ताब्यात दिले होते तर सुरक्षा दलाने त्याला गोवा पोलिसांच्या स्वाधीन केले होते. या घटनेमुळे दाबोळीतील पोलिसांमध्ये पहाटेच्यावेळी खळबळ उडाली. या गुन्हेगाराचे नाव कश्मीर चरण सिंग(34) असे आहे.
अधिक माहितीनुसार कश्मीर सिंग हा गुन्हेगार पंजाबमध्ये एका चोरी प्रकरणात गुंतलेला होता. तसेच शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गंतही त्याच्यावर पंजाबमध्ये गुन्हा नोंद असून पंजाबमध्ये तो वॉन्टेड आहे. त्याच्याविरोधात पंजाबच्या पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केलेली आहे. पोलिसांना हवा असलेला हा गुन्हेगार शनिवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास दाबोळी विमानतळावर दाखल झाला होता. तो शारजाला प्रयाण करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, विमानतळावरील परदेशगमन विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशीत त्याच्यासंबंधी धक्कादायक माहिती मिळाली. तो पंजाब पोलिसांसाठी वॉन्टेड असल्याचे समजताच त्यांनी त्वरित ही माहिती विमानतळावरील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना दिली. दलाच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले व चौकशी केली. त्यामुळे शारजाला प्रयाण करण्याचा त्याचा प्रयत्न फसला. अखेर या गुन्हेगाराविरुद्ध अधिक कारवाई करण्यासाठी त्याला दाबोळीवरील पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
दाबोळी विमानतळाच्या परिसरातच दाबोळी पोलीस स्थानकाची सोय करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी उभ्या केलेल्या काही लोखंडी कंटेनरमधून हे पोलीस स्थानक कार्यरत आहे. या कंटेनरभोवती कच्चा स्वरूपाचे कुंपण आहे व जवळच मुख्य महामार्ग आहे. या व्यवस्थेचा लाभ उठवत सदर गुन्हेगाराने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला.
दहा फूट उंच कुंपणावरून उडी घेऊन पसार
त्याला पोलीस स्थानकात आणताच त्याने अस्वस्थ वाटत असल्याचे नाटक केले. उलट्या होऊ लागल्याचाही बहाणा करून दोनवेळा शौचालयात जाऊन आला. तिसऱ्यावेळी मात्र तो परत आलाच नाही. जवळपास दहा फुटांच्या कुंपणावरून उडी मारून तो पसार झाला. सकाळी साडे चारच्या सुमारास ही घटना घडली. सदर गुन्हेगार पसार झाल्याचे आढळून येताच दाबोळीतील पोलिसांमध्ये खळबळ उडाली. त्यांनी धावत पळत त्याचा शोध घेतला. महामार्गावर व नंतर जवळच्या रेल्वेमार्गावरही तो दिसून आला. मात्र, पुढे काळोख असल्याने तो गायबच झाला. दूरपर्यत शोध घेऊनही तो सापडला नाही. या घटनेची माहिती सर्व पोलीस स्थानकांना तसेच चेकनाक्यांपर्यंत देण्यात आली आहे. काल दिवसभरात पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागला नाही. तो पुन्हा तावडीत सापडेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल धामस्कर व इतर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
दोन पोलीस सेवेतून निलंबित
दरम्यान, संध्याकाळी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्हेगाराला हाताळण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेऊन पोलीस हवालदार मिलिंद रायकर व पोलीस शिपाई मिथून नाईक या दोन पोलिसांना दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया यांनी सेवेतून निलंबित केले आहे. या निष्काळजीपणाबाबत या पोलिसांची चौकशी करण्यात येणार आहे.