वृत्तसंस्था/ तरनतारन, ओटावा
कॅनडातील हॅमिल्टन शहरात दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबारात पंजाबमधील तरनतारन येथील एका 21 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ही विद्यार्थिनी कॅनडातील ओंटारियोमधील मोहॉक कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होती. ती नेहमीप्रमाणे स्टॉपवर बसची वाट पाहत असताना झालेल्या गोळीबारात तिचा नाहक बळी गेला. मृत विद्यार्थिनीचे नाव हरसिमरत रंधावा असे आहे. बुधवारी घडलेल्या या घटनेचा हॅमिल्टन पोलीस तपास करत आहेत. गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी हरसिमरत रंधावा जखमी अवस्थेत निदर्शनास आल्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारादम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेबाबत दुतावास अधिकाऱ्यांनी भारतीय परराष्ट्र व्यवहार विभागाशी संपर्क साधल्यानंतर कुटुंबियांना माहिती देण्यात आली आहे.









