मानसा येथे गोळय़ा झाडल्या; दोन सहकारी जखमी; पंजाब सरकारकडून कालच सुरक्षेत कपात
मानसा / वृत्तसंस्था
प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. मानसातील जवाहरके गावात त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात मुसेवाला याला प्राण गमवावे लागले तर त्याचे दोन साथीदार जखमी झाले. सिद्धू मुसेवाला आपल्या साथीदारांसह कारमधून जात असताना काळय़ा रंगाच्या कारमधून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. यात हल्लेखोरांनी झाडलेली गोळी वर्मी लागल्याने कारमध्येच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आप सरकारने शनिवारीच त्याच्या सुरक्षेत कपात केली होती. मुसेवाला याला पूर्वी 8 ते 10 बंदुकधारी सुरक्षा पुरवत होते. मात्र, पंजाब सरकारच्या सुरक्षा कपातीच्या निर्णयानंतर त्यांना केवळ दोनच बंदुकधारी पुरविण्यात आले होते.
गायक सिद्धू मुसेवाला याच्यावर मानसा येथे गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर हल्लेखोर फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी व्यापक शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. ठिकठिकाणी नाकाबंदीही करण्यात आली आहे. गोळीबारानंतर सिद्धू मुसेवाला याच्यासह अन्य दोघांना मानसा येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी सिद्धू याला मृत घोषित केले. तसेच हल्ल्यात जखमी झालेल्या अन्य दोघांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.