वृत्तसंस्था / चेन्नई
हॉकी इंडियाच्या येथे शुक्रवारी झालेल्या 15 व्या उपकनिष्ठ पुरुषांच्या हॉकी स्पर्धेचे अजिंक्यपद पंजाबने पटकाविले. अंतिम सामन्यात पंजाबने झारखंडचा 4-3 अशा गोलफरकाने पराभव केला.
पंजाब आणि झारखंड यांच्यातील अंतिम सामना शेवटपर्यंत चुरशीचा झाला. या सामन्यातील दुसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत झारखंडचे पाठोपाठ दोन गोल तनी पुर्ती आणि अनिष डुंगडुंग यांनी अनुक्रमे 21 व्या आणि 24 व्या मिनिटाला नोंदविले. अक्षित सेलारीयाने 29 व्या तसेच वरिंदर सिंगने 30 व्या मिनिटाला गोल करुन पंजाबला झारखंडशी बरोबरी साधून दिली. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत होते. या सामन्यातील खेळाच्या तिसऱ्या सत्रात सुखू गुरीयाने झारखंडला पुन्हा आखाडीवर नेले. गुरियाने हा गोल 42 व्या मिनिटाला नोंदविला. पंजाबच्या मनदीप सिंगने 45 व्या आणि 53 व्या मिनिटाला असे दोन गोल करुन झारखंडचे आव्हान 4-3 अशा गोलफरकाने संपुष्टात आणले. या स्पर्धेत उत्तरप्रदेशने तिसरे स्थान मिळविताना मध्यप्रदेशचा 5-3 असा पराभव केला.









