वृत्तसंस्था/ मुंबई
2024 च्या आयपीएल क्रिकेट हंगामासाठी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या क्रिकेट विकास प्रमुखपदी भारताचा माजी अष्टपैलू संजय बांगरची नियुक्ती करण्यात आली आहे. 2014- 16 या कालावधीत संजय बांगर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे प्रमुख प्रशिक्षकपद भूषवित होते.
बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली किंग्ज इलेव्हन पंजाबने 2014 साली झालेल्या आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली होती. 2014 ते 2019 या कालावधीत संजय बांगर हे भारतीय संघाचे फलंदाज प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू विराट कोहलीला बांगर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. गेल्या तीन आयपीएल मोसमामध्ये संजय बांगर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाचे प्रमुख प्रशिक्षक होते. संजय बांगर यांनी आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत 12 कसोटी, 15 वनडे, 165 प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत.









