वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली कॅपिटल्सचा सामना आज शनिवारी आयपीएलच्या 12 व्या फेरीत पंजाब किंग्सशी होणार असून यावेळी त्यांना त्यांच्या भारतीय फलंदाजांकडून अधिक उपयोगी दृष्टिकोनाची अपेक्षा असेल. हा सामना दिल्लीसाठी प्रतिष्ठा राखून ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असेल. कारण ते ‘प्ले-ऑफ’च्या शर्यतीतून बाहेर पडल्यात जमा आहेत.
11 सामन्यांमध्ये चारच विजय मिळवल्याने दिल्ली कॅपिटल्सने पुढील तीन सामने जिंकले, तरी त्यांचे केवळ 14 गुण होतील. ते त्यांना अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी पुरेसे नसेल. त्यामुळे त्यांचे भवितव्य इतर संघ कशी कामगिरी करतात त्यावर अवलंबून असेल. दिल्लीच्या संघातील भारतीय फलंदाजांनी फारच कमी योगदान दिले आहे आणि एक तर कर्णधार डेव्हिड वॉर्नर, यष्टीरक्षक-फलंदाज फिल सॉल्ट किंवा अष्टपैलू मिचेल मार्श यांनी डावाला गती दिली आहे. मनीष पांडे, रिपल पटेल आणि अमन हकीम खान हे खेळाडू सामन्याच्या परिस्थितीनुसार त्यांचा खेळ बदलू शकलेले नाहीत.
मधल्या फळीच्या अपयशाने दिल्लीच्या आशांवर प्रामुख्याने पाणी टाकले आहे. परिणामी एकदा वरची फळी परतल्यानंतर त्यांना लक्ष्याचा पाठलाग करणे जमलेले नाही. चेन्नई सुपर किंग्सविऊद्ध हे प्रकर्षाने दिसून आलेले आहे. मोसमाच्या पूर्वार्धात प्रभावी दिसलेल्या कर्णधार वॉर्नरने गेल्या पाच डावांपैकी तीनमध्ये एकेरी धावसंख्या नोंदविलेली आहे. सॉल्ट दोन तडाखेबंद खेळी खेळला, पण तोही तीन सामन्यांत स्वस्तात बाद झालेला आहे. मार्शने एकदा सनरायजर्स हैदराबादविऊद्ध धडाका लावला, पण बाकीच्या सामन्यांत तो फारसे काही करू शकलेला नाही. मात्र या ऑस्ट्रेलियन खेळाडूने गेल्या तीन सामन्यांमध्ये नियमित बळी घेतलेले आहेत.
गोलंदाजीत अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या त्यांच्या फिरकी जोडीने चांगली कामगिरी केली आहे, तर वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि खलील अहमद यांनी नियमित बळी घेतलेले आहेत. वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतलेला वेगवान गोलंदाज अँरिच नॉर्टजेची अनुपस्थिती मात्र त्यांना गेल्या सामन्यात जाणवली. दुसरीकडे, 11 सामन्यांतून 10 गुण झालेल्या पंजाब किंग्ससाठी हा सामना कुठल्याही परिस्थिती जिंकणे आवश्यक आहे. कारण मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सविऊद्ध त्यांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे. गेल्या दोन सामन्यांत त्यांचे गोलंदाज प्रतिस्पर्धी फलंदाजांना लक्ष्य पार करण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत.
पंजाबला मागील सामन्यात आघाडीच्या तीन संघांमध्ये पोहोचण्याची संधी होती. परंतु रिंकू सिंगने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून पंजाबच्या आशा धुळीस मिळवल्या. शिखर धवन हा त्यांचा सर्वोत्कृष्ट फलंदाज राहिलेला आहे, परंतु त्याचा सलामीचा जोडीदार प्रभसिमरन सिंगबद्दल तसेच म्हणता येणार नाही. भानुका राजपक्षेला दुखापतीतून सावरून पुनरागमन केल्यानंतर खातेही उघडता आले नाही. मात्र त्याचा फॉर्म महत्त्वाचा असेल. जितेश शर्मा आणि अष्टपैलू लियाम लिव्हिंगस्टोन यांनी काही वेळा चांगली फटकेबाजी केलेली आहे.
गोलंदाजीत अर्शदीप सिंग हा त्यांचा प्रमुख गोलंदाज असला, तरी नॅथन एलिस आणि सॅम करनसह तो महागडा ठरलेला आहे. दर्जेदार ऑफस्पिनरचा अभाव संघाला जाणवलेला आहे. लेगस्पिनर राहुल चहरकडे सातत्याचा अभाव आहे, तर लिव्हिंगस्टोनला पाच सामन्यांत फक्त दोन आणि डावखुरा फिरकीपटू हरप्रीत ब्रारला 10 सामन्यांत फक्त 5 बळी घेता आले आहेत.
संघ : पंजाब किंग्स : शिखर धवन (कर्णधार), शाहऊख खान, मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, गुरनूर सिंग ब्रार, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, बलतेज सिंग, नॅथन एलिस, कागिसो रबाडा, राहुल चहर, हरप्रीत ब्रार, सॅम करन, सिकंदर रझा, हरप्रीत भाटिया, विद्वथ कावेरप्पा, मोहित राठी, शिवम सिंग.
दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, सर्फराज खान, अमन हकीम खान, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, खलील अहमद, कुलदीप यादव, रोवमन पॉवेल, रिली रोसो, मुस्तफिजुर रहमान, चेतन साकारिया, मुकेश कुमार, फिल सॉल्ट, लुंगी एनगिडी, प्रवीण दुबे, ललित यादव, रिपल पटेल, विकी ओस्तवाल, इशांत शर्मा, मनीष पांडे, कमलेश नागरकोटी, यश धुल.









