ऑनलाईन टीम/तरुण भारत
पंजाबचे आरोग्यमंत्री विजय सिंगला (Vijay Singla) यांची मंत्रीमंडळातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. सिंगला यांनी कंत्राटं देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून एक टक्का कमिशन मागितले होते. यासंदर्भात पुरावा मिळाल्याने मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann) यांनी सिंगला यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करत पंजाब पोलिसांना त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले होते. नंतर काही वेळातच लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने सिंगला यांना अटक केली आहे.
सिंगला यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप या अगोदरही करण्यात आला होता. आता त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे मिळाल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपल्या मंत्रीमडळातून सिंगला यांची हकालपट्टी केली आहे. मान यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एक व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे, आम्ही एका पैशाचाही भ्रष्टाचार सहन करणार नाही. भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनातून आमचा पक्ष (आप) उदयास आला आहे. या विश्वासावर खरे उतरण्याची जाबाबदारी आमच्यावर आहे. विजय सिंगला यांना मी मंत्रिमंडळातून काढून टाकत असून या प्रकरणाची पोलीस चौकशीची मागणीही केली आहे.