शेतकरी नेते डल्लेवाल संदर्भात ‘सर्वोच्च’ इशारा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या 25 दिवसांपासून उपोषण करत असलेले शेतकरी नेते जगजीतसिंग डल्लेवाल यांची प्रकृती अस्वस्थ आहे. त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याची जबाबदारी पंजाबच्या राज्यसरकारवर आहे, असा स्पष्ट इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या संदर्भात न्यायालयाने काही दिशानिर्देशही पंजाब सरकारला दिले होते. शुक्रवारी या प्रकरणी पुन्हा सुनावणी करण्यात आली.
पंजाब सरकारने डल्लेवाल यांच्या प्रकृतीसंबंधी योग्य ती दक्षता घ्यावी. त्यांना जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका पोहचणार नाही, हे राज्य सरकारने पाहिले पाहिजे. गेल्या 48 तासांमध्ये डल्लेवाल यांच्या प्रकृतीची घसरण झाली आहे. पंजाब सरकारने त्वरित योग्य ती पावले उचलावीत आणि परिस्थिती चिघळू देऊ नये. अन्यथा उत्तरदायित्व राज्य सरकारवर असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
विविध दिशानिर्देश
न्या. सूर्यकांत आणि न्या. उज्जल भुयान यांच्या खंडपीठासमोर सध्या शेतकरी आंदोलनासंबंधीच्या विविध याचिकांची सुनावणी करण्यात येत आहे. डल्लेवाल यांच्या प्रकृतीची तपासणी चोवीस तास करण्यात यावी. पंजाबचे अॅडव्होकेट जनरल गुरमिंदर सिंग यांनी या संदर्भात मान्यतापत्र (अंडरटेकिंग) सादर करावे. आवश्यकता भासल्यास विनाविलंब डल्लेवाल यांना रुग्णालयात घेऊन जावे. या संदर्भात कोणतेही दुर्लक्ष करु नये, असे विविध दिशानिर्देश न्यायालयाने दिले.
त्यांचे मन वळवा
जगजीतसिंग डल्लेवाल उपचार करुन घेण्यास नकार देत आहेत, असे प्रतिपादन पंजाब सरकारच्या वतीने करण्यात आले. त्यावर न्यायालयाने त्यांना डल्लेवाल यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करा. वैद्यकीय उपचारांसाठी त्यांनी सहकार्य करावे अशा प्रकारचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला गुरमितसिंग यांना दिला. गुरुवारी डल्लेवाल यांनी राज्य सरकारला सहकार्य केले होते. त्यांनी विविध वैद्यकीय परीक्षणे करुन घेण्यास मान्यता दिली होती. त्यांची प्रकृती अशक्त झाली असली तरी अद्याप सर्व शारिरीक यंत्रणा काम करीत आहेत. त्यांच्यावर राज्य सरकारने सातत्याने लक्ष ठेवले आहे, असे प्रतिपादन गुरमितसिंग यांनी केले आहे.









