वृत्तसंस्था/ मुल्लानपूर
मुल्लानपूर येथे आज रविवारी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगमधील फॉर्मात असलेल्या पंजाब किंग्सविऊद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरला त्यांच्या फलंदाजी विभागाकडून खूपच सुधारित प्रदर्शनाची अपेक्षा असेल. मागील सामन्यात झालेल्या मानहानीकारक पराभवातून सावरायला बेंगळूरला वेळ मिळालेली नाही.
शुक्रवारी बेंगळूरमध्ये पंजाबविरुद्ध आरसीबीची 9 बाद 95 अशी घसरण झाली आणि सामना पाच गड्यांनी गमावण्याचा प्रसंग त्यांच्यावर आला. पावसामुळे 14 षटकांच्या झालेल्या सामन्यात आरसीबीचे फिल सॉल्ट, विराट कोहली, कर्णधार रजत पाटीदार आणि लियाम लिव्हिंगस्टोनसारखे फलंदाज त्यांच्या घरच्या प्रेक्षकांसमोर अपयशी ठरले. गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असलेला आरसीबी आज धमाकेदार सुऊवात करण्यासाठी सॉल्ट आणि कोहलीवर अवलंबून असेल आणि मधल्या फळीत स्थिरता आणण्यासाठी जबाबदारी पाटीदार, लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, कृणाल पंड्या आणि टीम डेव्हिड यांच्यावर असेल.
गोलंदाजीच्या आघाडीवर जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमार माऱ्याचे नेतृत्व करतील, परंतु त्यांना यश दयाल, कृणाल आणि सुयश शर्मासारख्या खेळाडूंकडून खूप जास्त पाठिंबा आवश्यक असेल. दुसरीकडे, पंजाब श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करत आहे आणि सध्या सात सामन्यांतून पाच विजयांसह गुणतालिकेत अग्रक्रमांकावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मागे आहे. पंजाबचे अर्शदीप सिंग, झेवियर बार्टलेट आणि मार्को जॅनसेन हे वेगवान गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहेत, तर लेगस्पिनर युजवेंद्र चहलने मधल्या षटकांमध्ये महत्त्वपूर्ण बळी घेतलेले आहेत. फलंदाजीत युवा प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग पंजाबच्या डावाला चांगली सुऊवात मिळवून देतील अशी अपेक्षा आहे. अय्यर, जोश इंग्लिस, नेहल वढेरा, शशांक सिंग आणि मार्कस स्टॉइनिस अशी मजबूत मधली फळी त्यांच्याकडे आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, जोश हेझलवूड, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, रसिक सलाम, सुयश शर्मा, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, नुवान तुषारा, मनोज भंडागे, जेकब बेथेल, देवदत्त पडिक्कल, स्वस्तिक चिकारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी.
पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग नेहल वढेरा, शशांक सिंग, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅनसेन, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, यश ठाकूर, सूर्यांश शेडगे, प्रवीण दुबे, विजयकुमार वैशाख, हरप्रीत ब्रार, अजमतुल्ला ओमरझाई, जोश इंग्लिस, झेवियर बार्टलेट, विष्णू विनोद, एरोन हार्डी, कुलदीप सेन, हरनूर सिंग, मुशीर खान, पायला अविनाश.
सामन्याची वेळ : दुपारी 3.30 वा.









