पंजाबचा लडाखवर एकतर्फी विजय, मणिपूरची सिक्कीमवर मात
वृत्तसंस्था/ नारायणपूर, छत्तीसगड
स्वामी विवेकानंद पुरुष यू-20 राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये पंजाबने लडाखचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. अन्य एका सामन्यात मणिपूरने सिक्कीमला हरवून आगेकूच केली. पंजाबने गट क मधील सामन्यात लडाखवर 8-1 अशा गोलफरकाने मात करीत पुढील फेरीत स्थान मिळविले. या विजयासह पंजाबने गटात अग्रस्थान मिळविले. अग्रस्थान व उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविण्यासाठी पंजाबला तीन गुणांची गरज होती. त्यांनी लडाखचा धुव्वा उडवित हे उद्दिष्ट साध्य केले. विशेष म्हणजे लडाखने या सामन्यात पहिला गोल नोंदवून काही काळासाठी आघाडी घेतली होती. पण नंतर पंजाबने वर्चस्व गाजवित मध्यंतराला 3-1 अशी आघाडी घेतली. इम्रान अलीने आठव्या मिनिटाला लडाखचा गोल नोंदवला. पण पुढच्याच मिनिटाला गौरव सिंगने रिबाऊंड झालेल्या चेंडूवर फटका मारत गोल नोंदवून पंजाबला बरोबरी साधून दिली.
25 व्या मिनिटाला हरमनदीप चिंगने बाऊन्स झालेला चेंडू लडाखच्या गोलरक्षकाच्या डोक्यावरून गोलपोस्टमध्ये मारत पंजाबला आघाडी मिळवून दिली. 43 व्या मिनिटाला गुरमीत सिंगने गोल नोंदवून पंजाबची आघाडी 3-1 अशी केली. उत्तरार्धातही पंजाबने लडाखवरील वर्चस्व कायम राखले. अरुण कुमार चांडलाने 68 व 69 व्या मिनिटाला लागोपाठ दोन गोल नोंदवल्यानंतर 79 व्या मिनिटाला दमणदीप कुमारने संघाचा सहावा गोल केला. चांडलाने नंतर 85 व्या मिनिटाला आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. इंज्युरी वेळेत 92 व्या मिनिटाला अर्शवीर सिंगने आठवा गोल नोंदवत लडाखवरील दणदणीत विजय निश्चित केला. पंजाबने 9 गुणांसह गटात आघाडीचे स्थान मिळविले.
मणिपूर विजयी
याच गटातील अन्य एका सामन्यात मणिपूरने सिक्कीमचा 6-1 अशा गोलफरकाने पराभव केला. पूर्वार्धात त्यांनी 2-0 अशी आघाडी होती तर उत्तरार्धात त्यात आणखी चार गोलांची भर घातली. के. लेम्बा सिंगने (8, 10, 74 वे मिनिट) हॅट्ट्रिक केली तर अबाशनेही 72, 85, 94 व्या मिनिटाला गोल करीत हॅट्ट्रिक पूर्ण केले. सिक्कीमचा एकमेव गोल रागपे लेपचाने 48 व्या मिनिटाला नोंदवला.









