माजी आमदार परशुराम उपरकर यांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील अनधिकृत कॉरी क्रशर वाल्यांकडून बेकायदा शासनाचे नियम डावलून मोठ्या प्रमाणावर अवैध दगड उत्खनन सुरु असून अशा कॉरी क्रशरवाल्यांवर योग्य ती कारवाई केली जावी तसेच मालकीच्या जमिनीत बेकायदा ब्लास्टिंग करून दगड उत्खनन करणाऱ्या संबंधित मालकाला 49 लाख रुपयांचा ठोठावलेला दंड सावंतवाडी प्रांताधिकारी यांनी माफ केला असून याबाबत पुन्हा निर्णय देऊन त्या कॉरी मालकावर योग्य ती दंडात्मक कारवाई केली जावी अशी मागणी सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्याकडे मनसे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली.
सावंतवाडी प्रांताधिकारी पानवेकर यांची मनसे नेते परशुराम उपरकर यांनी भेट घेतली. यावेळी तालुक्यातील अनधिकृत कॉरी क्रशर वाल्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. सावंतवाडी तालुक्यात इन्सुलि- वेत्ये, निगुडे भागात कॉरी क्रशर जास्त प्रमाणात आहेत. या क्रशर मधून जोरदार दगड उत्खनन सुरु आहे. शासनाने दिलेली मर्यादा डावलून राजरोसपणे क्रशरवाल्यांकडून अवैध उत्खनन सुरूच आहे. महसूल विभागाचा कोणताही अंकुश त्यांच्यावर नसून शासनाच्या गौण खनिज नियमांचा भंग केला जात आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे याची नोंद घेण्यात यावी. बहुतांशी कॉरी क्रशर वाल्यांनी अद्याप परवानगी घेतलेली नाही. निगुडे, वेत्ये भागात जास्त ब्लास्टिंग केल्यामुळे ग्रामस्थांच्या भिंतीना तडे गेले आहेत त्यांची भरपाई देखील अद्याप मिळालेली नाही. निगुडे भागात मालकीच्या जमिनीत अवैध दगड उत्खनन झाले होते. याबाबत कॉरी मालकाला 49 लाख रुपयांचा दंड सावंतवाडी तत्कालीन तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी ठोठावला होता. कॉरी मालकाने स्वतः दिलेल्या लेखी जबाबात त्याची कबुली देखील दिली असून शासनाचा दंड भरण्याची तयारी दर्शविली होती. असे असूनही अपिलात प्रांताधिकारी यांनी निकालात तब्बल 49 लाखांचा दंड माफ केला. यामुळे शासनाचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणाचा पुन्हा सखोल तपास केला जाऊन दोषी कॉरी क्रशर मालकावर कारवाई करून दंड वसुली केली जावी अशी मागणी माजी आमदार उपरकर यांनी केली आहे . प्रांताधिकारी पानवेकर यांनी या प्रकरणाची पुन्हा फेरतपासणी केली जाईल, तलाठी मंडळ अधिकारी यांच्या मार्फत पुन्हा पंचनामा करून अहवाल तयार केला जाऊन योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. यावेळी मनसे पदाधिकारी माजी शहराध्यक्ष तथा विद्यार्थीसेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, प्रकाश साटेलकर, मंदार नाईक, निलेश देसाई, नंदू परब, विजय जांभळे, सुरेंद्र कोठावळे, मनोज कांबळी, स्वप्निल जाधव,अभि पेंडणेकर, रमेश शेळके सागर येडगे आदी उपस्थित होते.









