सरपंच आरती च्यारी यांची माहिती
म्हापसा : काणका बांध येथे श्री साईबाबा मंदिराच्या समोर खाली येत असताना काणका तसेच भोवताल परिसरातील नागरिक येथे आणून आपल्या गावातील कचरा टाकतात याची दखल घेत वेर्ला काणका पंचायतीच्या सरपंच आरती प्रवीण च्यारी, उपसरपंच दिगंबर कळंगुटकर तसेच पंच मोहन दाभाळे यांनी शनिवारी या भागाची पाहणी करून येथील रस्त्यावरील कचरा व आजूबाजूला वाढलेली झाडे झुडपे बुलडोझरच्या सहाय्याने साफ करीत यापुढे येथे कोण कचरा टाकणार त्याला पंचायतीतर्फे 5 हजार ऊपये दंड ठोठावण्यात येईल, असा स्पष्ट इशारा गावच्या सरपंच आरती च्यारी यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
साईबाबा मंदिराच्या मार्गक्रमण करणाऱ्या या सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यावर कचरा काही बेजबाबदार लोकांकडून टाकला जात आहे. परिणामी रस्त्यावर कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पंचायतीने येथे कचरा टाकणाऱ्यांना 5 हजार ऊपये दंड देणार असा सूचना फलकही उभारला आहे. तरी येथे लोक कचरा टाकत आहेत. हा परिसर म्हापसा पालिका तसेच वेर्ला काणका पंचायतीच्या सीमेवर येतो. भटकी कुत्रेही येथे ताव मारतात. परिणामी हा कचरा पसरतो. सायंकाळच्यावेळी शाळकरी मुले तसेच कामावरून सुटलेल्या महिला वर्ग येथून ये-जा करतात. याच रस्त्याचा वापर करतात. येथे कुत्रीही लोकांच्या अंगावर धावून चावा घेण्यास येतात. यामुळे येथे अपघात होण्याची शक्यताही आहे. या कचऱ्याची दखल घेत वेर्ला काणका पंचायत मंडळाने सरपंच, उपसरपंच व पंच सदस्यांनी या ठिकाणी शनिवारी उपस्थित राहून येथील कचरा व झाडे झुडपे बाजूला केली व या भोवताल परिसराची तपासणीही केली.
सर्वांनी पंचायतीला सहकार्य करावे- उपसरपंच दिगंबर कळंगुटकर
उपसरपंच दिगंबर कळंगुटकर म्हणाले की, कचऱ्याची येथे मोठी समस्या आहे. हणजूण, म्हापसा आदी भोवताल परिसरातील लोक येथे कचरा आणून टाकतात त्यांना आम्ही पकडलेही मात्र येथे वीज नसल्याने त्याचा फायदा घेत येथे कचरा टाकला जात होता हे लक्षात घेऊन वीज अभियंत्याला बोलावून येथे वीज घालण्याचे काम सुरू आहे. येथे झाडे झुडपे वाढली होती ती कापून साफ सफाई केली आहे. लोकांनी आम्हाला सहकार्य करावे. गावात घरोघरी कचरा पंचायतीतर्फे गोळा केला जातो. मात्र येथे गावाबाहेरील लोक येऊन येथे कचरा टाकतात. यापुढे त्यांनी खबरदारी घ्यावी असे उपसरपंच कळंगुटकर म्हणाले. हाऊसिंग बोर्ड, खोर्ली म्हापसा येथील लोकही कचरा येथे टाकतात. चिकनही येथे टाकतात. सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे असे उपसरपंच म्हणाले. पंच मोहन दाभाळे म्हणाले, काणका गावातील कचऱ्याकडे आमचे पूर्ण लक्ष आहे. आम्ही येथे सीसीटीव्ही कॅमेरा घालणार व दंडही देणार. आम्ही प्कचऱ्याची समस्या सोडविणार असे ते म्हणाले.
यापुढे काणकात कचरा टाकणारे सीसीटीव्हीत कैद होणार
बाहेरून आणून काणका गावात कचरा टाकणाऱ्यावर नियंत्रण व देखभाल ठेवण्यासाठी या परिसरात आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. आणि जो कुणी येथे कचरा टाकणार त्याची छबी काढून वा वाहन क्रमांक काढून त्यांना 5 हजार ऊपये दंड देण्यात येईल. अशी माहिती सरपंच आरती प्रवीण च्यारी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.









