५ वर्षे सश्रम कारावर व ३ हजार रुपयांचा दंड; लांजा येथील स्टोन क्रशर खाणीवरील घटना
रत्नागिरी प्रतिनिधी
लांजा तालुक्यातील कोर्ले खिंड येथे स्टोन क्रशर खाणीवर कामगाराला फावड्याने मारहाण करुन गंभीर जखमी करणाऱ्या मुकादमला सत्र न्यायालयाने ५ वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. विलास काशिनाथ राठोड (२५, रा. कोर्ले खिंड मुळ विजापूर कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
रत्नागिरी सत्र न्यायाधीश एस.एस. गोसावी यांनी या खटल्याचा निकाल दिला. तर सरकार पक्षाकडून ऍड. प्रफुल्ल साळवी यांनी काम पाहिल़े खटल्यातील माहितीनुसार आरोपी विलास राठोड हा लांजा तालुक्यातील कोर्ले खिंड येथे शरद दत्ताराम लाखण यांच्या स्टोन क्रशर खाणीवर मुकादम म्हणून काम करत होता. तर नवनाथ धुलाप्पा पवार (३३, रा. कोर्ले खिंड लांजा) हा त्या ठिकाणी दगड उचलण्याचे काम करत होता.
खाणीचे काम सुरु असताना ३० एप्रिल २०२० रोजी दुपारी नवनाथ पवार हा जेवणाच्या सुट्टीनंतर ५ मिनीटे उशिराने कामावर आला. याचा राग आल्याने मुकादम असलेल्या विलास राठोड याने नवनाथ याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास राठोड याने नवनाथ याच्या डोक्यामध्ये लोखंडी फावडे मारुन गंभीर दुखापत केली. तसेच ठार मारुन टाकण्याची धमकी दिली. अशी तक्रार नवनाथ याने लांजा पोलीस ठाण्यात दाखल केली होती.