प्रतिनिधी,रत्नागिरी
Ratnagiri News : राजापूर तालुक्यातील नाणार येथील 16 वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेत शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्याला न्यायालयाने शिक्षा ठोठावली. विजय बाळू चव्हाण (23, रा. नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला 10 वर्षे सक्तमजुरी व 25 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. नाटे पोलिसांच्यावतीने विजय याच्याविरूद्ध आरोपपत्र ठेवण्यात आले होते.
रत्नागिरी अतिरिक्त सत्र व विशेष पॉक्सो न्यायाधीश वैजयंतीमाला आबासाहेब राऊत यांनी खटल्याचा निकाल दिल़ा सरकार पक्षाच्यावतीने ॲड अनुपमा ठाकूर यांनी युक्तीवाद केल़ा खटल्यातील माहितीनुसार, 22 ऑक्टोबर 2021 रोजी नाणार येथील 16 वर्षीय महाविद्यालयीन युवतीला फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा नाटे पोलिसांत दाखल करण्यात आला होता. पोलीस तपासात आरोपी मुळचा नाशिक येथील असून तो कामानिमित्त नाणार येथे वास्तव्याला होता. तरव पीडिता ही मुळची नाणार येथील रहिवासी आहे. नाणार येथेच दोघेही राहत असल्याने त्यांच्यात ओळख निर्माण झाली. कालांतराने ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. यातूनच 22 ऑक्टोबर 2021 रोजी पीडितेला फूस लावून नाशिक येथे नेले. तसेच तिला लग्नाचे आमिष दाखवून पीडितेशी शरीरसंबंध पस्थापित केले, असा आरोप विजय चव्हाण याच्याविरूद्ध ठेवण्यात आला होता.
पीडित मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तकारीनुसार, नाटे पोलिसांनी आरोपी विजय चव्हाणविरूद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 (पॉक्सो) चे कलम 4 व 8 नुसार गुन्हा दाखल केला. नाटे पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी गुह्याचा तपास करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवले. खटल्यादरम्यान एकूण 15 साक्षीदार सरकारी पक्षाकडून तपासण्यात आले.









