पुणे / प्रतिनिधी :
बालपणीच विज्ञानाची गोडी लागली आणि तो छंद बनला… त्याच छंदामुळे अवघ्या 11 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचण्याचा मान पुण्यातील रोहन भंसाळी याला मिळाला. छोटय़ा वयातच अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक् अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन (नासा) या संस्थेच्या योजनेत सहभागी होण्याची संधी त्याला मिळाली आहे.
नासाच्या अंतराळ मोहिमांची रचना निर्मिती करून त्यात प्रयोग करण्याची संधी विद्यार्थ्यांना देणारा ‘क्यूब इन स्पेस प्रोग्राम’ ही योजना आहे. यात वास्तविक जगातील किंवा पृथ्वीशी संबंधित समस्यांबाबत छोटय़ा पातळीवरील प्रयोग केले जातात. यातच 11 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना तळहातावर मावेल एवढा उपग्रह तयार करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. अंतराळात जाणारे मनुष्य, सामान आणि यान यांचे अती तीव्र अल्ट्रा-व्हायोलेट किरणोत्सर्गापासून (यूव्ही, सी, बी, ए) अधिक चांगले रक्षण व्हावे, यासाठी विविध औद्योगिक साहित्याचा यात अभ्यास करण्यात येणार आहे. यामध्ये रोहन भंसाळी याच्या प्रयोगाचीही निवड झाली आहे. यासाठी नासाच्या चमूने विविध पातळय़ांवर अत्यंत काटेकोरपणे चाचण्या घेतल्या.
रोहन याने तयार केलेल्या क्यूबमध्ये 4 यूव्ही सेन्सॉर्स, 3 निवडक पदार्थ (रेशीम, ऍल्युमिनियम आणि प्लॅस्टिक) आणि मायक्रोप्रोसेसर यांचा समावेश आहे. या क्यूबने स्ट्रॅटोस्फिअरमध्ये केलेल्या 12 तासांच्या प्रवासात प्रत्येक पाच मिनिटांनी यात माहिती गोळा करण्यात येणार आहे. स्ट्रॅटोस्फिअर हा वातावरणातील 1,64,041 फूट उंचीवरील भाग असतो. त्या तुलनेत विमाने ही समुद्रसपाटीपासून 30,000 फुटांवरून उडतात.
विद्या व्हॅली स्कूलमध्ये सहावीत शिकणाऱ्या रोहनने याबाबत सांगितले की, शाळेतील माझ्या शिक्षिका यांच्याकडून मला या प्रकल्पाची माहिती मिळाली. मला विज्ञानाची आवड असल्यामुळे त्यासाठी अर्ज करण्यासाठी प्रिंसिपल नलिनी सेनगुप्ता यांनी माझी निवड केली. मला विज्ञानात रस आहे आणि मला अभ्यासक्रमाशिवायही इतर उपक्रमांमध्ये सहभागी व्हायला आवडते. विज्ञानातील नवीन संकल्पना जाणून घ्याव्यात, या हेतूने मी यात सहभागी होण्याचे ठरवले. कुटुंबातील सदस्यांनीही मला पाठिंबा दिला.
या प्रकल्पाविषयी अधिक माहिती देताना रोहन म्हणाला, अंतराळ हे खूप रोमांचक आहे आणि अजूनही खूप अज्ञात आहे. आपल्या सूर्यमालेची त्रिज्या जवळपास 9 अब्ज किमी एवढी आहे आणि एका सूर्यामध्ये 13 लाख पृथ्वी बसू शकतात. मी संशोधन करत असताना या अचंबित करणाऱ्या गोष्टी मला कळाल्या. म्हणून, सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या पदार्थांवर, उदा. कपडय़ांसाठी रेशीम किंवा अन्न आणि औषधांच्या पॅकेजिंगवर होणारा परिणाम याचा अभ्यास मला करायचा होता. मी सेन्सर्स, एक छोटा संगणक आणि कोडेड प्रोग्राम असलेला 4 बाय 4 सें.मी.चा प्रयोग तयार केला. तो आपोआप चालेल.









