वृत्तसंस्था/ चेन्नई
2025 च्या प्रो-कब•ाr लीग स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात पुणेरी पलटनने जयपूर पिंक पँथर्सवर 41-36 अशा 5 गुणांच्या फरकाने थरारक विजय मिळविला. या सामन्यात पुणेरी पलटनच्या आदित्य शिंदेने सुपर-10 गुण नोंदविले.
या सामन्यात पुणेरी पलटनतर्फे आदित्य शिंदेने सुपर-10 गुण, पंकज मोहितेने 8 व मोहित गोयातने 7 गुण नोंदविले. जयपूर पिंक पँथर्सतर्फे अली समादिने एकाकी लढत देताना 22 गुण घेतले. सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर दोन्ही संघांनी आपल्या आक्रमक चढायांवर झटपट गुण मिळविले. पुणेरी पलटनच्या गुणांचे खाते पंकज मोहितेने उघडले. तर जयपूर पिंक पँथर्सचे खाते साहिलने उघडले. या सामन्यात आदित्य शिंदे आणि अली समादि यांच्यात वारंवार शाब्दिक चकमकी उडाल्याने पंचांनी हस्तक्षेप करुन दोघांनाही समज दिला. पुणेरी पलटनने विशाल भारद्वाजच्या शानदार चढाईवर 2 गुणांची आघाडी मिळविली. त्यानंतर आदित्य शिंदेने जयपूर पिंक पँथर्सचे सर्व गडी बाद केल्याने पुणेरी पलटनने जयपूर संघावर सुरुवातीलाच 12-6 अशी आघाडी मिळविली होती. सामन्याच्या पहिल्या सत्रात पुणेरी पलटनने 8 गुणांची आघाडी घेतली होती. पिंक पँथर्सच्या आर्यन कुमारने अली समादि समवेत पुणेरी पलटनचे गडी बाद करुन आपल्या संघाची पिछाडी बरीच भरुन काढली. पंकज मोहितेने आपल्या चढाईवर पुणेरी पलटनची आघाडी 11 गुणांनी वाढविली. त्यानंतर विशाल भारद्वाजच्या शानदार खेळीने जयपूर पिंक पँथर्सचे या सामन्यात दुसऱ्यांदा सर्व गडी बाद झाले. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत पुणेरी पलटनने जयपूर पिंक पँथर्सवर 25-12 अशी 13 गुणांची भक्कम आघाडी मिळविली.
या सामन्यात खेळाच्या उत्तरार्धात पुणेरी पलटनच्या तुलनेत जयपूर पिंक पँथर्सचा खेळ अधिक आक्रमक झाला. अली समादिने आपल्या सुपर चढाईवर सुपर-10 गुण नोंदवित जयपूर पिंक पँथर्सची पिछाडी भरुन काढली. अली समादिला रेझा मिरबाघेरीकडून चांगली साथ मिळाली. दरम्यान अजित शिंदेने सुपर-10 गुण मिळवित सामना संपण्यास केवळ 10 मिनिटे बाकी असताना पुणेरी पलटनला 5 गुणांची आघाडी मिळवून दिली होती. सामन्यातील 3 मिनिटे बाकी असताना दोन्हु संघ 33-33 असे बरोबरीत राहिले. त्यानंतर शेवटच्या 3 मिनिटांमध्ये पुणेरी पलटनच्या दादासो पुजारीने आपल्या चढाईवर महत्त्वाचे गुण मिळविले. शेवटी मोहित गोयातच्या शानदार कामगिरीमुळे पुणेरी पलटनने जयपूर पिंक पँथर्सचा 41-36 अशा गुण फरकाने पराभव केला.









